
हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या 23 जानेवारी रोजी असलेल्या जयंतीचे औचित्य साधून शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षातर्फे मुंबईसह राज्यभरात विविध सामाजिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
परळमध्ये दिव्यांग मुलांना खाऊवाटप
परळ येथील सुभाष डामरे मित्र मंडळ आणि शिवराज प्रतिष्ठानचे संस्थापक आनंद गावकर, संचालक सुधीर साळवी, जीवन कामत, संजय सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली परळ येथील पोईबावडी शाळेतील दिव्यांग मुलांना शैक्षणिक साहित्य आणि खाऊ वाटप करण्यात आले. शिवसेना राष्ट्रीय संघटक रवींद्र कुवेसकर, विभागप्रमुख महेश सावंत, माजी नगरसेविका उर्मिला पांचाळ यांच्या हस्ते वाटप करण्यात आले. उपविभागप्रमुख पराग चव्हाण, कार्याध्यक्ष प्रभाकर मोरजकर, रवींद्र ओटवकर, संतोष कांबळी, रूपेश कोचरेकर, प्रफुल गावकर, प्रवीण घोले, दिनेश लोखंडे, प्रवीण वेंगुर्लेकर, रवींद्र कांदळकर, नीलाक्षी चेंदवणकर, आयोजक नाना फाटक आणि सुवर्णा गुराम उपस्थित होते.
दिंडोशी विधानसभेत ‘साहेब उत्सव’
शिवसेनाप्रमुखांच्या जयंतीनिमित्त शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते, दिंडोशी विधानसभेचे आमदार सुनील प्रभू यांनी 15 जानेवारी ते 10 फेब्रुवारीपर्यंत ‘साहेब उत्सवा’चे आयोजन केले आहे. शिवसेनाप्रमुखांची जयंती मोठय़ा उत्साहात साजरा करताना शिवबंधन सप्ताहदेखील साजरा होत आहे. या वर्षीदेखील हा पंधरवडा संस्कार आणि संस्कृतीची जपणूक करण्यासाठी साजरा केला जाणार आहे. या उत्सवातून शिवसेना एकात्मता आणि संस्कृतीचे जतन करण्याची शिकवण पुढच्या पिढीला देते.
‘साहेब उत्सव’च्या निमित्ताने दिंडोशी विधानसभा क्षेत्रात संजय गांधी निराधार योजनेअंतर्गत विविध योजना व पेन्शनधारकांना आदेशपत्र व ओळखपत्र वाटप, दिंडोशी विधानसभाअंतर्गत प्रभागात दिनदर्शिका वाटप, 3500 विद्यार्थ्यांना दहावी परीक्षा सराव प्रश्नसंच वाटप, सार्वजनिक व घरगुती गणेश स्पर्धा बक्षीस वितरण कार्यक्रम, दिव्यांग व्यक्तींना व्हीलचेअर वाटप, कबड्डी व क्रिकेट स्पर्धा, आयुष्मान व आधारकार्ड कॅम्प, रक्तदान शिबीर, ज्येष्ठ नागरिकांना देवदर्शन, ज्येष्ठ नागरिक कार्ड वाटप, चित्रकला स्पर्धा, आरोग्य शिबीर, नेत्र चिकित्सा शिबीर असे अनेक समाजोपयोगी कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

























































