दहा वर्षांपूर्वीच्या खटल्यातून नगरसेवक बाळा नर निर्दोष

153
anant-bala-nar

सामना प्रतिनिधी । मुंबई

सामाजिक कार्यकर्त्यांना ठार मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी दाखल खटल्यातून अंधेरी येथील महानगर दंडाधिकारी न्यायालयाने आज शिवसेना नगरसेवक अनंत (बाळा) नर यांच्यासह इतर अन्य शिवसैनिकांची निर्दोष मुक्तता केली. तब्बल 10 वर्षांहून अधिक काळापूर्वी दंगल माजविणे, मारहाण करणे तसेच ठार मारण्याची धमकी देणे असे आरोप ठेवून विलेपार्ले पोलिसांनी बाळा नर यांच्यासह 6 ते 7 शिवसैनिकांविरुद्ध खटला भरला होता. परंतु आरोप सिद्ध करण्यास फिर्यादी पक्षाला अपयश आल्याने महानगर दंडाधिकारी एस. सी. पठारे यांनी सर्वांना निर्दोष सोडले.

मुंबईतील नागरिकांना भेडसावणारी पाण्याची समस्या सोडवून त्यांना पाण्याचे समान वाटप कसे करता येईल याचा निर्णय घेण्यासाठी 13 ऑक्टोबर 2007 साली मुंबईच्या त्यावेळच्या महापौर शुभा राऊळ यांच्या नेतृत्वाखाली विलेपार्ले येथील दीनानाथ नाटय़गृहात एक बैठक बोलावण्यात आली होती.

अतिरिक्त आयुक्त श्रीवास्तव, तत्कालीन स्थायी समिती अध्यक्ष रवींद्र वायकर, सभागृह नेते सुनील प्रभू या बैठकीत सहभागी झाले होते. नागरिकांच्या पाण्याविषयीची समस्या जाणून घेण्यासाठी अनेक सामाजिक कार्यकर्त्यांनाही बैठकीस बोलावण्यात आले होते. बैठक सुरू असतानाच काही सामाजिक कार्यकर्त्यांनी थेट व्यासपीठावर जाऊन गोंधळ घालण्यास सुरुवात केली. त्यावेळी बाळा नर आणि इतर शिवसैनिकांनी या कार्यकर्त्यांना चांगलाच चोप दिला होता.

या प्रकरणी तब्बल एक महिन्यानंतर म्हणजे 13 नोव्हेंबर 2007 रोजी विलेपार्ले पोलीस ठाण्यात दंगल माजविणे, मारहाण करणे तसेच ठार मारण्याचा प्रयत्न करणे या कलमांखाली गुन्हे दाखल केले होते. परंतु बाळा नर तसेच इतर शिवसैनिकांची बाजू मांडणारे प्रसिद्ध वकील ऍड. सुहास घाग यांनी केलेल्या प्रभावी युक्तिवादामुळे फिर्यादी पक्षाला आरोप सिद्ध करता आले नाही. त्यामुळे या सर्वांची निर्दोष मुक्तता झाली.

आपली प्रतिक्रिया द्या