दसरा मेळाव्यातील तोफांचे देशभरात पडसाद, राजकीय क्षेत्रात जबरदस्त चर्चा

शिवसेना पक्षप्रमुख व मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शिवसेनेच्या दसरा मेळाव्यात केंद्रातील भाजपा सरकारवर जबरदस्त तोफा डागल्या. त्याचे पडसाद आज देशभरात उमटले. उद्धव ठाकरे यांच्या सडेतोड भाषणाची राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा होती. सोशल मीडियावर तर देशभरातून उद्धव ठाकरे यांच्यावर स्तुतीसुमने उधळली गेली. ‘जय हो… उद्धव ठाकरे’ अशा उत्स्फूर्त प्रतिक्रिया व्यक्त झाल्या. विशेष म्हणजे एरव्ही राजकारणावर बोलणे टाळणाऱ्यांनीही उद्धव ठाकरे यांचे मनापासून काैतुक केले.

शिवसेना पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री अशा दोन्ही भूमिकांतून बोलताना उद्धव ठाकरे यांनी दसरा मेळाव्यात केलेले भाषण हे केवळ शिवसैनिक आणि महाराष्ट्रातील अकरा कोटी जनतेसाठीच नाही तर देशातील तमाम नागरिकांसाठी मार्गदर्शनपर ठरले. भाजपाचे कावेबाज राजकारण, सरकारे पाडण्याची कारस्थाने, जाणीवपूर्वक रखडवून ठेवलेला जीएसटी, महाराष्ट्राची बदनामी करण्याचे षडयंत्र आदी अनेक मुद्यांवरून उद्धव ठाकरे यांनी भाजपा सरकारची अक्षरश: सालटी काढली.

व्हॉट्सअप, ट्विटरसारख्या सोशल मिडियावर आज उद्धव ठाकरे यांच्या भाषणाचीच चर्चा होती. एकीकडे शेतकरीविरोधी कायदे बनवणारे भाजपा सरकार आणि दुसरीकडे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने हजारो कोटींची मदत करणारे ठाकरे सरकार अशी तुलना नेटकऱ्यांनी केली. केवळ शिवसेनेचा वाघच केंद्रातील भाजपाला आव्हान देऊ शकतो अशी प्रतिक्रिया देत नेटकऱ्यांनी ‘उद्धव ठाकरे आगे बढो…हम आपके साथ है’ असे नारे दिले. हिंमत असेल तर सरकार पाडून दाखवा असे उद्धव ठाकरे यांनी भाजपाला खुले आव्हान दिले. शिवसेना आणि शिवसेना पक्षप्रमुखांच्या या धाडसाचीही सोशल मिडियावर वाहवा होत आहे.

कुणीही कितीही टरटर केली तरी आकाश फाटणार नाही आणि पाऊस काही पडणार नाही

कोणी कितीही टरटर केली तरी आकाश काही फाटणार नाही आणि पाऊस काही पडणार नाही असा जबरदस्त टोला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी नारायण राणे यांचे नाव न घेता लगावला आहे. शिवसेनेच्या दसरा मेळाव्यात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केलेल्या भाषणानंतर नारायण राणे व भाजप नेत्यांनी पत्रकार परिषदा घेऊन मुख्यमंत्री आणि महाविकास आघाडी सरकारवर टीका केली आहे. या टीकेला नवाब मलिक यांनी चांगलेच उत्तर दिले आहे. नवाब मलिक यांनी कोणाचेही नाव न घेता नारायण राणे यांना जोरदार टोला लगवला आहे. भाजपचे काही नेते मुख्यमंत्र्यांच्या बाबतीत अपशब्द वापरत आहेत. हे बोलणे योग्य नाही, असे नवाब मलिक म्हणाले. सभ्य समाजात आणि राजकारणात असंसदीय शब्दांचा प्रयोग होत असेल तर तो चुकीचा आहे. प्रत्येकाने मर्यादेत राहून भाषेचा प्रयोग केला पाहिजे असा सल्ला नवाब मलिक यांनी दिला आहे.

उद्धव ठाकरे यांचे कार्य हृदयाला भिडले! प्रशांत भूषण यांचे ट्विट

सर्वोच्च न्यायालयाचे ज्येष्ठ वकील प्रशांत भूषण यांनीही उद्धव ठाकरे यांचे जाहीर कौतुक केले. प्रशांत भूषण यांनी त्यासंदर्भात ट्विट केले. ‘मी कधी शिवसेनेचा, ठाकरे यांचा फॅन नव्हतो, पण महाराष्ट्राचे मुख्यमंत्री बनल्यानंतर उद्धव ठाकरे यांनी ज्या पद्धतीने स्वत:ला घडवले आणि कार्य करत आहेत. ते हृदयाला भिडले’, असे भूषण यांनी या ट्विटमध्ये लिहिले आहे. त्याबरोबर त्यांनी एका इंग्रजी वृत्तपत्रात छापून आलेले उद्धव ठाकरे यांचे भाषणही शेअर केले आहे.

आपली प्रतिक्रिया द्या