
बॉम्बे हायकोर्टचे नामकरण मुंबई उच्च न्यायालय असे करावे, अशी मागणी शिवसेनेने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व संसदीय कार्यमंत्री चंद्रकांत पाटील यांच्याकडे केली आहे. नागपूर येथे होणाऱ्या हिवाळी अधिवेशनात त्यासंदर्भात ठराव मंजूर करून तो पेंद्र सरकारला पाठवावा, असेही शिवसेनेने म्हटले आहे.
शिवसेना नेते आमदार सुनील प्रभू यांनी राज्य सरकारला त्यासंदर्भात पत्र दिले आहे. बॉम्बेचे मुंबई नामकरण झाल्यानंतर राज्यातील बहुतांश संस्थांनी आपली नावे बदलली आहेत, मात्र बॉम्बे हायकोर्टाच्या नावामध्ये अजूनही बॉम्बेच उल्लेख आहे.
मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा यासाठीही विधिमंडळात प्रस्ताव मंजूर करून तो केंद्र सरकारला पाठवण्यात आला होता. त्याचप्रमाणे बॉम्बे हायकोर्टचे मुंबई उच्च न्यायालय असे नामांतर करावे यासाठी 8 डिसेंबर रोजी नागपूर येथील हिवाळी अधिवेशनात विशेष शासकीय ठराव मांडण्यात यावा व यास सर्वानुमते मंजुरी देऊन हा ठराव केंद्र सरकारकडे तातडीने मंजूर करण्यासाठी कार्यवाहीसाठी पाठवण्यात यावा, असे सुनील प्रभू यांनी पत्रात नमूद केले आहे.
– बॉम्बे हायकोर्टचे मुंबई उच्च न्यायालय करण्याबाबतचा विषय ऐरणीवर असून गेल्या वीस वर्षांपासून केंद्र सरकारशी अनेक आमदार व खासदारांनी त्यासंदर्भात पाठपुरावा करूनदेखील यावर कोणतीही कार्यवाही झालेली नाही याकडे सुनील प्रभू यांनी या पत्रात लक्ष वेधले आहे. केंद्र सरकारने लेटेस्ट पेटंट ऑफ हायकोर्ट 1862 यानुसार सुधारणा करावी अशी सूचनाही त्यांनी मांडली आहे.

























































