
पश्चिम द्रुतगती महामार्गावर (अली यावर जंग महामार्ग) वांद्रे ते दहिसरपर्यंत सकाळी व सायंकाळी प्रचंड वाहतूककोंडी असते आणि त्यातूनच मार्ग काढत नागरिकांना अवघे 25 किलोमीटर अंतर पार करायला दोन ते अडीच तास लागतात. त्यामुळे मुंबई उपनगरातील वाहतूककोंडी फोडण्यासाठी पश्चिम द्रुतगती महामार्ग द्विस्तरीय करावा, अशी मागणी शिवसेनेने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे.
पश्चिम द्रुतगती महामार्ग हा मुंबईतील एक प्रमुख 8 ते 10 पदरी रस्ता आहे, जो मीरा रोडपासून वांद्रेपर्यंत पसरलेला आहे. हा महामार्ग दहिसर, बोरिवली, कांदिवली, मालाड, गोरेगाव, जोगेश्वरी, अंधेरी, विलेपार्ले, सांताक्रूझ, वांद्रे इत्यादी अनेक महत्त्वाच्या उपनगरांना जोडतो ज्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळाचा समावेशदेखील आहे. या महामार्गावरून दररोज 4 लाखांहून अधिक वाहने ये-जा करतात. पश्चिम द्रुतगती महामार्गाच्या देखभाल आणि दुरुस्तीची जबाबदारी असलेल्या मुंबई पालिकेने या महत्त्वाच्या मार्गावरील वाहतूक सुधारण्यासाठी काही योजना आखल्या आहेत. गोरेगाव उड्डाणपूल, जोगेश्वरी-विक्रोळी लिंक रोड जंक्शन आणि दहिसर टोल नाका यासारख्या प्रमुख चौकांवर वारंवार होणारे अडथळे हे बऱयाच काळापासून वाहतूककोंडीचा विषय आहेत. तसेच हा महामार्ग अनेक पालिका वॉर्डांमधून जातो, ज्यामुळे दुभाजक, पदपथ आणि अडथळ्यांसह रस्त्यांच्या पायाभूत सुविधांमध्ये विसंगती निर्माण होतात. यासाठी पायाभूत सुविधांचे मानकीकरण करण्यासाठी आणि सर्व वॉर्डांमध्ये आवश्यक विकास सुनिश्चित करण्यासाठी जलद उपाययोजना पालिकेच्या स्तरावर केल्या जाणार आहेत.
सागरी सेतू पार केल्यानंतर वांद्रे ते दहिसरपर्यंत सकाळी व सायंकाळी वाहतूककोंडी असते आणि त्यातूनच मार्ग काढत नागरिकांना अवघे 25 किलोमीटर अंतर पार करायला दोन ते अडीच तास लागतात. म्हणूनच या महामार्गावरील वाहतूककोंडी सोडविण्यासाठी हा महामार्ग द्विस्तरीय करणे आवश्यक असल्याची मागणी आमदार सुनील प्रभू 2014पासून करत आहेत. मात्र आजमितीपर्यंत कोणतीही ठोस उपाययोजना आखण्यात आलेली नाही.
पश्चिम द्रुतगती महामार्ग द्विस्तरीय करण्यासाठी रस्त्याच्या खाली असलेल्या पायाभूत सुविधांची तपासणी करून मगच नियोजन करणे आवश्यक आहे. म्हणूनच एमएमआरडीए, महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ, भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरण अथवा मुंबई महानगर पालिकेमार्फत विशेष नियोजन करून व निधीची तरतूद करून पश्चिम द्रुतगती महामार्ग द्विस्तरीय करावा, जेणेकरून यावरील होणारी वाहतूककोंडी कमी होऊन वाहतूक सुरळीत होईल, अशी आग्रही मागणी शिवसेना नेते, विभागप्रमुख- आमदार सुनील प्रभू यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे.