गोकुळ दूध संघाच्या कार्यकारी संचालकांवर कारवाई करा; शिवसेनेचे सहायक दुग्ध निबंधकांना निवेदन

kolhapur gokul shiv sena

विना टेंडर दूध संस्थांना तब्बल पावणेचार कोटींचे जाजम आणि घडय़ाळ भेटवस्तू वाटप करण्यात आले. याप्रकरणी गोकुळ दूध संघाचे कार्यकारी संचालक योगेश गोडबोले यांनी अजूनही लेखी खुलासा दिला नसल्याने, त्यांच्यावर कारवाई करण्यासाठी आज शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या वतीने सहायक दुग्ध निबंधक प्रदीप मालगावे यांना निवेदन देण्यात आले.

शेतकऱ्यांच्या कष्टाच्या पैशांची उधळपट्टी करणाऱयांची चौकशी करून कारवाई करा, तसेच पशुखाद्य घोटाळा व सहकुटुंब गोवा सहलीसाठी खर्च केलेल्या लाखो रुपयांची चौकशी करा, अन्यथा आपल्या खात्याविरोधातही तीव्र आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला.

‘गोकुळ’चे कार्यकारी संचालक गोडबोले यांनी तीन कोटी 74 लाखांचे जाजम व घडय़ाळ भेटवस्तू देताना कोणत्या आधारे ही खरेदी केली, असे निवेदन दोन आठवडय़ांपूर्वी दिले होते. या भेटवस्तू देण्यासंदर्भात कोणतीही हरकत नाही; पण कायदेशीर की बेकायदेशीर हा प्रश्न अजून अनुत्तीर्णच आहे. गोडबोले यांनी 15 ऑगस्टपर्यंत याबाबत खुलासा देण्याचे जाहीर केले होते. पण आजतागायत त्यांनी तो दिला नसल्याने या प्रकरणाच्या चौकशीसाठी निवेदन देत असल्याचे शिवसेना उपनेते संजय पवार व सहसंपर्कप्रमुख विजय देवणे यांनी स्पष्ट केले.

शेतकऱयांच्या कष्टाच्या पैशातून बेकादेशीररीत्या अधिकाराचा दुरुपयोग करून उधळपट्टी होत असेल, तर त्याची चौकशी करून कडक कारवाई करण्यासंदर्भात कृती होणे आवश्यक असल्याचे निवेदनात म्हटले आहे.