
लक्ष्मीदर्शनामुळे माजी नगरसेवक आणि पदाधिकारी जरी सत्ताधाऱ्यांच्या गोटात गेले असले तरी निष्ठावंत शिवसैनिक आणि जनता शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या मागे खंबीरपणे उभी आहे. दिवसेंदिवस सत्ताधाऱ्यांचा जनाधार घटत चालल्यामुळे ते सैरभैर झाले असून त्यांच्याकडून अफवा पसरवल्या जात आहेत. मात्र त्याचा काहीएक उपयोग आता होणार नाही. जनाधार शिवसेना आणि महाविकास आघाडीच्या बाजूने असल्याने नवी मुंबई महापालिकेवर भगवा फडकवणार आहे, असा विश्वास शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नवी मुंबई जिल्हा संपर्कप्रमुख एम. के. मढवी यांनी आज व्यक्त केला.
आगामी पालिका निवडणुकीत सत्ताधाऱ्यांच्या एका गटाला मदत करण्याचे आदेश शिवसैनिकांना आले आहेत, असा अपप्रचार मिंधे गटाकडून सुरू करण्यात आला आहे. या अफवा पसरवणाऱ्यांना एम. के. मढवी यांनी आज पत्रकार परिषद घेऊन जोरदार फटकारले. जो कचरा होता, तो लक्ष्मीदर्शन झाल्यानंतर निघून गेला आहे. या कचऱ्याबरोबर मरगळही गेली आहे. त्यामुळे असा कितीही अपप्रचार केला तरी त्याचा कोणताही परिणाम शिवसेनेच्या जनाधारावर होणार नाही. त्यांचा जनाधार घटत चालल्यामुळेच त्यांच्याकडून असा खोडसाळपणा सुरू आहे, असा आरोपही एम. के. मढवी यांनी यावेळी केला.
याप्रसंगी जिल्हाप्रमुख प्रकाश पाटील, प्रवीण म्हात्रे, जिल्हा संघटक रंजना शिंत्रे, उपजिल्हाप्रमुख सूर्यकांत मढवी, संतोष घोसाळकर, सुनील गव्हाणे, सुमित्र कडू, मनोज इसवे, संदीप पाटील, दिलीप म्हात्रे, युवासेनेचे सहसचिव करण मढवी, शहरप्रमुख विशाल ससाणे, उपजिल्हा संघटक शुभांगी रावखंडे, कार्यालयप्रमुख एकनाथ दुखंडे उपस्थित होते.