
उदय जोशी । बीड
माजलगाव तालुक्यातील पवारवाडी येथील जय महेश साखर कारखान्याने 1 जानेवारी 2018 ला गाळप केलेल्या ऊसाचे पैसे अद्यापही शेतकऱ्यांना दिलेले नाहीत, ते शेतकऱ्यांना तात्काळ देण्यात यावेत या मागणीसाठी शिवसेनेने जिल्हाप्रमुख सचिन मुळूक, आप्पासाहेब जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली जय महेश कारखाना विरोधात दंड थोपटले आहेत. शेकडो महिला पुरूष शेतकरी व शिवसैनिकांनी आयुक्त कार्यालयासमोर 10 ऑक्टोबर बुधवार रोजी झोपडी आंदोलन सुरू केले. त्यानंतर आज साखर आयुक्त आंदोलनकर्त्यांशी चर्चा करणार आहेत.
शेतकऱ्यांच्या ऊसाचे पैसे (बील) शासनाच्या नियमानुसार पंधरा दिवसाच्या आत देणे बंधनकारक असताना देखील जय महेश साखर कारखान्याकडून गेली 10 महीने झाले बिलाची रक्कम अद्याप मिळत नसल्याने शेतकरी हैराण आहेत. कारखान्याकडून बिलासाठी शेतकऱ्यांची आर्थिक पिळवणूक होत आहे. ऊसाचे पैसे कारखाना देत नसल्याने शेतकऱ्य़ांवर आत्महत्या करण्याची वेळ आली आहे. याबद्दल अनेकवेळा आंदोलने व पाठपुरावा करूनही गेंड्याची कातडी पांघरून घेतलेले कारखाना प्रशासन कसलीच दखल घेत नसल्याने योग्य ती कार्यवाही होत नसल्याने कारखान्यास गाळप झालेल्या सर्व शेतकऱ्यांचे ऊसाचे पैसे (बिल), ऊस तोडणी ठेकेदार व ऊस वाहतूक ठेकेदार यांचे पैसे तात्काळ देण्यात यावेत या मागणीसाठी पुणे आयुक्त कार्यालयासमोर शिवसेना स्टाईलने झोपडी निवास आंदोलन करण्यात आले.
दरम्यान, प्रश्न सुटल्या शिवाय आंदोलन मागे घेणार नाही अशी भूमिका घेतल्याने साखर आयुक्तांचे धाबे दणाणले आहे. आंदोलनकर्त्यांशी चर्चा करणार असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं आहे.
जिल्हाप्रमुख सचिन मुळूक, आप्पासाहेब जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली या आंदोलनात सुशील पिंगळे, संजयभाई महाद्वार, रामराजे सोळंके, अभय मोहरील, अॅड. दत्ता रांजवण, पप्पू धरपडे, लक्ष्मण सोळंके, दासु पाटील,रामदास ढगे, हनुमंत शिंदे, संदीप माने बादाडे, तीर्थराज पांचाळ, गजानन गिराम यांच्यासह शिवसैनिक, शेकडो महिला व पुरुष शेतकरी आंदोलनात सहभागी झाले होते.




























































