कुरुंदवाडातील पूरग्रस्तांना शिवसेनेचा मदतीचा हात

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

शिरोळ तालुक्यातील पूरग्रस्तांच्या कुटुंबाला मदत करण्यासाठी शिवसेना धावून आली असून शिवसेनेच्यावतीने पूरग्रस्तांना संसारोपयोगी साहित्याचे वाटप करण्यात आले.

महिन्याभरापूर्वी तालुक्यातील कृष्णा-पंचगंगा नदीला पूर आला आणि बघता बघता पुराच्या पाण्याने संपूर्ण कुरुंदवाड शहर पाण्याखाली गेले होते. यात अनेक घरे पाण्याखाली गेल्याने घरांची पडझड झाली. तर अनेकांचे संसार महापुराच्या पाण्यात वाहुन गेले होते. या पूरग्रस्तांना मदत करण्यासाठी शिवसेना पुढे सरसावली आहे. शिवसेनेचे शहर प्रमुख राजू आवळे गेल्या एक महिन्यापासून गावातील नागरिकांना मदत करत आहेत.पुराच्या पाण्यातून अनेक नागरिकांना सुरक्षित ठिकाणी स्थलांतरीत करण्यात आले.

त्याचबरोबर पूरग्रस्त नागरिकांना अन्न ,वस्त्र ,निवारा उपलब्ध करून देण्यात आला. तसेच शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशानुसार गावातील सर्व पूरग्रस्त कुटूंबाना शिव साहायच्या रूपाने तांदूळ,गहू, कडधान्य, याचबरोबर संसारउपयोगी साहित्य आणि शाळकरी विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले. आ उल्हास पाटील, जिल्हाप्रमुख मुरलीधर जाधव, तालुका प्रमुख सतीश मलमे यांच्या मार्गदर्शनाखाली शहर प्रमुख राजू आवळे,महिला शहर प्रमुख वैशाली जुगळे, मार्केट कमिटी सभापती आप्पासो भोसले,रामभाऊ माळी,यांनी शहरातील सर्व गरजू कुटुंबाला संसार उपयोगी साहित्य वाटप केले. यावेळी चक्रवर्ती माळी,अमित आवळे, रणजित आवळे,राजू बेले,यांच्यासह महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.