
शिवसेनेच्या हिंदुत्वावर राजकीय प्रश्न उपस्थित करणारे विरोधक पोटदुखे आहेत. आमच्या हिंदुत्वाला तुमच्याकडून प्रमाणपत्र घेण्याची गरज नाही. तुम्ही सर्टिफिकेट देणारे विद्यापीठ उघडलेले नाही. अशा शब्दात शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांनी ठणकावले आहे. संजय राऊत हे अयोध्येत असून गुरुवारी सकाळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी भाजपवर त्यांनी सडकून टीका केली. कोण किती हिंदुत्ववादी आहे, कोणाचे हिंदुत्व किती प्रखर आहे हे तुम्ही ठरवणार नाही. आम्ही, आमचा अंतरात्मा, आमचे कार्य, हिंदुत्वाप्रती असणारी आमची निष्ठा आणि संघर्ष हे हिंदुत्वाचे द्योतक आहे, असे राऊत यांनी बजावून सांगितले आहे.
ते पुढे म्हणाले की, आम्ही कधीच भूमिका बदलली नाही.हिंदुत्वाला सोडून राजकीय स्वार्थासाठी, खुर्चीसाठी राजकारण केले नाही. हिंदुत्वाच्या मुद्द्यावर आमच्याविरुद्ध बोलणारे नकली लोक आहेत. त्यांनी कश्मीरमध्ये महबुबा मुफ्ती यांच्यासोबत सरकार स्थापन केले होते तेव्हा त्यांचे कुठे हिंदुत्व गेले होते? ज्यांनी राम मंदिराच्या संदर्भात एक विचित्र भूमिका घेतली, आरएसएसला संपवण्याची भाषा केली अशा लोकांसोबत बिहारमध्ये हे सरकारमध्ये आहेत. राजकीय सोयीसाठी बदलेल्या भूमिका आणि त्यानंतर परत चुंबाचुंबी हे अशा प्रकारचे राजकारण आम्ही केले नाही. त्यामुळे आमच्या हिंदुत्वावर प्रश्नचिन्ह निर्माण करण्याचा तुम्हाला अधिकार नाही. आम्ही आमच्या विचारांशी, राष्ट्रीय स्वरुपाच्या हिंदुत्वाशी आम्ही प्रामाणिक आहोत असे राऊत यांनी म्हटले.
आम्ही हिंदुत्वाचा विचार घेऊन आलो!
आदित्य ठाकरे काल अयोध्येमध्ये होते. कमी वेळेमध्ये आम्ही जे कार्यक्रम घेतले ते छाप पाडून गेले. संपूर्ण महाराष्ट्र आणि देशाने अयोध्येतील कार्यक्रम पाहिले. शरयू तिरावरील आरतीचा नेत्रदीपक सोहळा गेल्या अनेक वर्षात या परिसरात झाला नाही असे इथले स्थानिक, पुजारी, साधू, संत आणि जनता आम्हाला सांगत होती. मुख्य म्हणजे या कार्यक्रमाला कोणतेही राजकीय स्वरुप नव्हते. शरयूच्या घाटावर जो सोहळा आपण अनुभवला तो अत्यंत रोमांचक, अध्यात्मिक, धार्मिक आणि राजकारणापलिकडला होता. आदित्य ठाकरे, आम्ही सर्व हिंदुत्वाचा विचार घेऊन येथे आलो आणि जातानाही आम्ही तोच विचार महाराष्ट्रात आलो, असेही राउत म्हणाले.
अयोध्येतून शिवसेनेला उर्जा मिळते
अयोध्येतून एक उर्जा घेऊन आम्ही जातो. वारंवार आम्ही अयोध्येमध्ये येण्याचे कारण हेच आहे की शिवसेनेच्या हिंदुत्वाच्या कार्याला जी गती मिळाली ती या अयोध्येच्या भूमीतून मिळाली. रामजन्मभूमीचे आंदोलन, त्यानंतरचे कार्य यासाठी इथून आम्हाला उर्जा मिळाली आणि त्यानंतर आम्ही दिल्लीच्या तख्तापर्यंत पोहोचलो. हे ऋण या मातीचे, अयोध्येचे, प्रभू श्रीरामाचे आमच्या सर्वांवर आहेत, आम्ही ते विसरणार नाहीत. त्यामुळे वारंवार आमची पावले अयोध्येकडे वळतात. आम्ही प्रभू श्रीरामापुढे, शरयू मातेपुढे नतमस्तक होतो, असेही राऊत यावेळी म्हणाले.
हिमालयासारखे नेतृत्व हिंदुंच्या मागे ठामपणे उभे राहिले
आदित्य ठाकरे राम मंदिराचे निर्माण कार्य सुरू असलेल्या ठिकाणी ‘जय श्री राम’ची छाप उमटवली. तो क्षण भावूक करणारा होता. स्वाभिमानाचा क्षण होता. या मातीशी आमचे जे नाते आहे ते दृढ करणारा, रोमांचित करणारा क्षण होता. अयोध्येचे महत्व शिवसेनेच्या जीवनामध्ये अत्यंत महत्त्वाचे आहे. शिवसेनेने हिंदुत्वाची अनेक आंदोलने उभारली. जेव्हा आम्ही हिंदुत्वाचा राजकीय पद्धतीने पुरस्कार करत नव्हतो तेव्हा मलंगगडापासून ते दुर्गाडी किल्ल्यापर्यंत आम्ही अशी अनेक आंदोलने महाराष्ट्रात केलेली आहेत. पण अयोध्येचे आंदोलन हे संपूर्ण आंदोलनाचे शिखर, कळस आहे. या आंदोलनाने शिवसेनेची ओळख या देशभरामध्ये प्रखर हिंदुत्ववादी, राष्ट्रवादी अशी झाली. हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे हे हिमालयासारखे नेतृत्व हिंदूंच्या मागे ठामपणे उभे आहे हे अयोध्येच्या आंदोलनाने सिद्ध केले, असे राऊत यांनी पत्रकार परिषदेत म्हटले.
दडपशाहीपुढे झुकणार नाही
पत्रकारांनी ईडीच्या कारवांबाबत विचारले असता संजय राऊत म्हणाले की, केंद्रीय तपास यंत्रणांचा आणि आपल्या हातातील संस्थांचा गैरवापर किती करावा याचे उत्तम उदाहरण ईडीच्या कारवाया आहेत. फक्त राहुल गांधी आणि सोनिया गांधीच नाही तर या देशातील सर्वच विरोधी पक्षांचा छळ करण्याचा, त्यांना अडकवण्याचा प्रयत्न आहे. महाराष्ट्रात माझ्यासह अनेक सहकारी, मंत्र्यांना याचा त्रास सहन करावा लागतोय. पण आम्ही प्रत्येकाने ठरवले आहे की या दडपशाहीपुढे झुकायचे नाही. त्यासाठी कोणतीही किंमत आम्ही मोजायला तयार आहोत
























































