कोकणात आदित्य ठाकरे यांच्या आजपासून खळा बैठका, अंगणात बसून पदाधिकाऱ्यांशी संवाद साधणार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

शिवसेना नेते, युवासेना प्रमुख, आमदार आदित्य ठाकरे हे उद्यापासून दोन दिवस कोकण दौऱ्यावर जाणार आहेत. या दौऱ्यामध्ये ते खळा बैठका घेणार आहेत. कोकणातील घरासमोरील अंगणाला खळा असे म्हटले जाते. त्या खळय़ांमध्ये बसून ते पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांशी संवाद साधणार आहेत.

खळा बैठक ही एक आगळीवेगळी संकल्पना आहे. कोकणातील खळा हा घराशी निगडित अनेक अविस्मरणीय क्षणांचा साक्षीदार असतो. त्याच खळय़ामध्ये गुरुवार, 23 नोव्हेंबर आणि शुक्रवार, 24 नोव्हेंबर असे दोन दिवस आदित्य ठाकरे पदाधिकारी, कार्यकर्त्यांशी मनमोकळा संवाद साधणार आहेत. आदित्य ठाकरे हे आपल्या घरी येऊन आपल्याशी संवाद साधणार असल्याने कोकणातील शिवसैनिकांमध्ये चैतन्याचे वातावरण आहे.

आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर आदित्य ठाकरे यांचा कोकणातील पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांशी होणारा हा संवाद महत्त्वाचा ठरणार आहे. स्थानिक प्रश्नांबद्दलही या वेळी चर्चा होऊ शकते. कोकणभूमी ही सुरुवातीपासूनच शिवसेनेच्या सोबत राहिली आहे. दोडामार्ग, सावंतवाडी, कुडाळ, कणकवली, चिपळूण, खेड, महाड, नागोठणे आदी ठिकाणी या खळा बैठका होणार आहेत.