शिवसेनेशी गद्दारी करणाऱ्यांना जनता लाथा घातल्याशिवाय राहणार नाही!

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

शिवसैनिकांच्या बळावर निवडून आलेले 40 आमदार, 13 खासदार पक्ष सोडून निघून गेले तरीही त्याचा कोणताही परिणाम शिवसेनेच्या कार्यावर झालेला नाही. कारण, हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा कट्टर शिवसैनिक शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याच पाठीशी भक्कमपणे उभा आहे. त्यामुळे येत्या निवडणुकीत शिवसेनेशी गद्दारी करणाऱयांना जनता त्यांची जागा दाखवून लाथा घातल्याशिवाय राहणार नाही, असा हल्लाबोल शिवसेना कोल्हापूर जिल्हा संपर्कप्रमुख अरुण दुधवडकर यांनी केले.

हातकणंगले तालुक्यातील हुपरी येथील यशवंत मंगल कार्यालयात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या ‘एकनिष्ठ मेळावा व नवनिर्वाचित सरपंच ग्रामपंचायत सदस्य यांचा सत्कार सोहळा’ अशा संयुक्त समारंभात ते बोलत होते. अध्यक्षस्थानी कोल्हापूर शिवसेना जिल्हाप्रमुख मुरलीधर जाधव होते. यावेळी हाजी अस्लम सय्यद, माजी आमदार उल्हास पाटील, शिवसेना सांगली जिल्हाप्रमुख अभिजित पाटील, मंगल चव्हाण, पट्टणकोडोलीच्या सरपंच भाग्यश्री कोळी, सात्ताप्पा भवान, मधुकर पाटील, महादेव गौड, बाजीराव पाटील, राजेंद्र पाटील, अमोल देशपांडे, विनायक विभुते, नगरसेविका पूनम पाटील, मीना जाधव, रघुनाथ नलवडे, अर्जुन जाधव, नामदेव गिरी, बाबासाहेब पाटील, दत्तात्रय पोवार, भरत देसाई, अकबर फरास, अक्षय चाणक्य, रमजान घुडुभाई, शिवाजी जाधव, अण्णासाहेब बिलुरे यांच्यासह शिवसैनिक, नागरिक मोठय़ा संख्येने उपस्थित होते. दरम्यान, यावेळी अरुण दुधवडकर यांच्या हस्ते अक्षय चाणक्य यांच्यासह त्यांच्या शेकडो समर्थकांनी शिवसेनेत प्रवेश केला. त्यानंतर सर्व नूतन सरपंच, सदस्यांचा सत्कार करण्यात आला.

अरुण दुधवडकर म्हणाले, शिवसेना नेत्यांच्या पाठीमागे शासकीय यंत्रणेचा चुकीच्या पद्धतीने ससेमिरा लावला आहे. हे जनता उघडय़ा डोळ्यांनी पाहत आहे. त्यामुळे जनता योग्यवेळी त्याचा हिशेब करणार आहे. अनेक सुशिक्षित, उच्च शिक्षित तरुण शिवसेनेत येत असल्यामुळे पक्ष भक्कम होत आहे, असेही ते म्हणाले.

मुरलीधर जाधव म्हणाले, ज्यांना जिल्हा परिषदेची जागा निवडून आणता आली नाही, अशा 15 दिवसांपूर्वी पक्षात आलेल्या गद्दाराला या प्रामाणिक शिवसैनिकांनी खासदार केले. याच गद्दार खासदाराला हेच शिवसैनिक येत्या निवडणुकीत त्याची जागा दाखवून त्याला अस्मान दाखविल्याशिवाय राहणार नाहीत, याची मला खात्री आहे, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.