
सामना प्रतिनिधी । परभणी
गेल्या दोन वर्षापासून परभणी जिल्ह्याच्या विकासाच्या दृष्टीने महत्वाचे पाऊल म्हणून ओळखले जाणारे महिला सहकारी सुतगिरणीस शासनाने मान्यता दिल्याने शिवसेना आमदार डॉ. राहुल पाटील यांच्या प्रयत्नांना यश आले आहे. मुंबईत मंत्री मंडळाच्या बैठकीत परभणी जिल्ह्यातील नांदगाव, एरंडेश्वर येथे महिला सहकारी सुतगिरणीला मान्यता देऊन निधी उपलब्ध करुन दिला असल्याची माहिती आमदार डॉ. पाटील यांनी दिली.
शिवसेना आमदार डॉ. राहुल पाटील यांनी मागील 2 वर्षापासून नांदगाव, एरंडेश्वरला जय भवानी महिला सहकारी सुतगिरणी उभारणीसाठी सतत पाठपुरावा केला. राज्याचे परिवहनमंत्री दिवाकर रावते यांनी मंगळवारी घेतलेल्या मंत्रीमंडळ बैठकीत परभणी जिल्ह्यातील महिला सुतगिरणीचा विषय मांडून मंजूर करण्यासाठी विशेष प्रयत्न केले. या संदर्भात आमदार डॉ. राहुल पाटील म्हणाले, परभणीपासून जवळच असलेल्या नांदगाव, एरंडेश्वर शिवारात मराठवाड्यातील एकमेव महिला सहकारी सुतगिरणी उभारण्यात येत आहे. सुतगिरणी उभारणीसाठी 1 कोटी 40 लाख रुपयांचे भाग भांडवल शासनाकडे जमा करण्यात आले आहे. नुकत्याच झालेल्या मंत्री मंडळाच्या बैठकीत परिवहन मंत्री दिवाकर रावते, सहकारीमंत्री सुभाष देशमुख यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना माहिती दिली. परभणी जिल्हा हा कापूस उत्पादक असल्याने कृषीवर आधारीत उद्योग उभारण्याच्यादृष्टीने आणि शेतकऱ्याचे जीवनमान उंचाविण्यासाठी सुतगिरीणीच आवश्यक आहे. मुख्यमंत्र्यांनी मराठवाड्यातील एकमेव जयभवानी महिला सहकारी सुतगिरणीस मान्यता देऊन निधीही उपलब्ध करुन दिला असल्याची माहिती आमदार डॉ. पाटील यांनी दिली.
दरम्यान, या सुतगिरणीच्या उभारणीसाठी नांदगाव, एरंडेश्वर शिवारात 25 एकर जमीनीवर अत्याधुनिक यंत्रसामुग्रीसाठी 64 कोटी रुपये लागणार आहेत, अशी माहिती डॉ. राहुल पाटील यांनी दिली.

































































