
सामना प्रतिनिधी । मुंबई
शिवसेनेच्या आमदारांनी गेल्या साडेचार वर्षांत राज्यातील जनतेच्या विविध प्रश्नांसाठी विधानसभेत सरकारला अक्षरशः धारेवर धरले. सत्तेत असलो तरी समाजासाठी सत्य मांडणार अशी भूमिका घेत शिवसेनेचा एकेक आमदार वाघासारखा सरकारला भिडला. शेतकरी, सर्वसामान्यांना न्याय मिळवून देण्यासाठी सभागृहाचे कामकाज बंद पाडले. तोच शेतकरी आणि तीच सर्वसामान्य जनता येत्या निवडणुकीत विधिमंडळावर भगवा फडकवेल, असा ठाम विश्वास विधिमंडळातील शिवसेनेचे मुख्य प्रतोद आमदार सुनील प्रभू यांनी व्यक्त केला.
‘बिनधास्त बोल’ या शीर्षकाखाली शिवसेनेच्या वाघांची विधानसभेतील कामगिरी शिवसेना भवनातून दर शुक्रवारी ‘फेसबुक लाइव्ह’ होत आहे. आज त्यात आमदार प्रभू यांनी शेतकरी कर्जमाफी, मराठा आरक्षण, नाणार, म्हाडा, गिरणी कामगारांची घरे आदींबाबत मुंबईकरांनी विचारलेल्या विविध प्रश्नांना उत्तरे दिली. दुष्काळग्रस्त शेतकऱयांसाठी, त्यांच्या कर्जमाफीसाठी शिवसेनेने राज्यात आणि विधिमंडळातही रान उठवले. विधान भवनाच्या पायऱयांवर आंदोलने केली. त्यामुळे विरोधी पक्षालाही शिवसेनेच्या भूमिकेला पाठिंबा द्यावा लागला आणि सरकारला कर्जमाफी करावी लागली असे सांगतानाच, दुष्काळग्रस्त शेतकऱयांच्या मदतीसाठी पॅकेज मिळावे म्हणून सरकारला धारेवर धरू, असा इशाराही प्रभू यांनी दिला.
मराठा समाजाला आरक्षण मिळावे अशा भूमिकेसाठी शिवसेना आमदारांनी विधिमंडळात सतत पाठपुरावा केला. आता या आरक्षणासाठी आंदोलन करताना मृत्युमुखी पडलेल्या तरुणांच्या कुटुंबीयांना सरकारने मदत द्यावी, मराठी आंदोलकांवरील गुन्हे मागे घ्यावेत यासाठीही शिवसेना सतत पाठपुरावा करत असल्याचे प्रभू यांनी सांगितले. मुंबई उपनगरासाठी म्हाडाचे स्वतंत्र दुरुस्ती मंडळ स्थापन करावे, गिरणी कामगारांना घरे मिळावीत, महापालिका भरतीत मुंबईकर खेळाडूंना आरक्षण मिळावे यासाठी शिवसेना सदैव आक्रमक राहील, असेही त्यांनी सांगितले.


























































