
महाराष्ट्रामध्ये ओबीसी विरुद्ध मराठा, धनगर विरुद्ध मराठा असा वाद सुरू झाला आहे. यामागे भारतीय जनता पक्ष असून राज्याची सामाजिक एकता अशा पद्धतीने उद्ध्वस्त करून निवडणुकांना सामोरे जायचे आणि जातीजातीत दुफळी निर्माण करून कपटी राजकारण करायचे कारस्थान भाजपने आखले आहे, असा घणाघात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते, खासदार संजय राऊत यांनी केला. ते सोलापुरात पत्रकारांशी संवाद साधत होते.
ओबीसी विरुद्ध मराठा हा वाद राज्यात कधीच नव्हता. हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी शिवसेना स्थापन केली तेव्हा आपण सर्व मराठी म्हणून एकत्र असायला हवे अशी स्पष्ट भूमिका घेतली होती. मराठा-मराठेतर, ब्राह्मण-ब्राह्मणेतर, घाटी-कोकणी, स्पृश्य-अस्पृश्य, 92 कुळी-96 कुळी हे सगळे वाद गाडून मराठी माणसाची भक्कम एकजूट उभारली नाही तर महाराष्ट्र तोडला जाईल, मुंबई तोडली जाईल, समाज दुभंगला जाईल… बाळासाहेबांनी आर्थिक निकषावर आरक्षण दिले पाहिजे अशीही भूमिका घेतली होती आणि आजची मागणी तिच आहे.मराठा, ओबीसी, धनगर समाजातील दुर्बलांना आरक्षण मिळाले पाहिजे ही मागणी करणे चूक नाही, असे राऊत म्हणाले.
मोदी जगाचे प्रश्न सोडवतात, युक्रेनचे युद्ध संपवतात, इस्रायल-गाझातील युद्ध थांबवतात, जो बायडेन, पुतिन यांना सल्ला देतात असे भाजपवालेच सांगतात. पण महाराष्ट्रात सुरू असलेल्या गंभीर विषयांवर त्यांची भूमिका काय आहे? भाजपने राज्याराज्यात अशा पद्धतीची दुफळी निर्माण करून राजकारण करण्याचे कारस्थान आखले आहे. हिंदू-मुसलमान नाणे चालणार नाही, हे नाणे आता गुळगुळीत झाल्याचे त्यांना माहिती आहे. त्यामुळे जातीजातीत भांडणे लावली जात आहेत, असा हल्लाबोल राऊत यांनी केला.
राज्याचे राजकारण सध्या राजकारण राहिलेले नाही. महाराष्ट्राने अनेक प्रमुख नेते पाहिले, त्यांचे राजकारण पाहिले. पण इतके सुडाचे, बदल्याचे आणि बदनामीचे राजकारण आम्ही महाराष्ट्राच्या संस्कृतीत कधी पाहिले नाही. हे गेल्या 10 वर्षापासून सुरू आहे. अशा घाणेरड्या राजकारणाची दशकपूर्ती झाली असून रावणाची 10 तोंड उडवली गेली तशी यांचीही उडवली जातील, असा इशाराही राऊत यांनी दिला.
2024मध्ये सोलापुरातील चित्रही वेगळे असेल. प्रकाश आंबेडकर यांनी हुकुमशाही राजवटीविरुद्ध दंड थोपटले आहेत. मोदींचा पराभव केल्याशिवाय संविधान आणि लोकशाही वाचणार नाही. संविधानाचे निर्माते डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे प्रकाश आंबेडकर यांचे आजोबा आहेत आणि संविधान वाचवण्याचे ओझे त्यांच्यावर आहे. देश आणि घटना वाचवण्याच्या लढाईत ते आघाडीवर असतील. त्यांच्या मागे मोठा सामाजिक वर्ग असून आम्ही सर्व एकत्र आहोत. सोलापूरचे राजकारण 2024 साली पूर्णपणे बदललेले दिसेल आणि भाजपची पाटी कोरी झाली असेल, असेही राऊत म्हणाले.

























































