देशात सिव्हिल वॉरसारखी परिस्थिती, राज्यसभेत शिवसेनेचा जबरदस्त हल्लाबोल

1384
sanjay-raut-parliament-new

कायदा हा जनतेचा आवाज दाबण्यासाठी नसतो तर जनतेला न्याय मिळावा यासाठी असतो. मात्र सध्या कायद्याचा धाक दाखवून जनतेचा आवाज दडपला जात आहे. देशात सध्या सिव्हिल वॉरसारखी परिस्थी आहे. देशाच्या ऐक्याला चूड लावण्याचा आणि फूट पाडण्याचे प्रयत्न होत आहेत, सरकारने नुसत्याच ‘सबका साथ, सबका विश्वास’ अशा पोकळ घोषणा न करता सर्वांशी संवाद साधून विश्वास निर्माण करावा तसेच समस्या सोडवायच्याच असतील तर त्या बेरोजगार, शेतकरी आणि सीमेवरील जवानांच्या सोडवा, अशा शब्दांत शिवसेनेने राज्यसभेत सरकारवर हल्लाबोल केला.

राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील धन्यवाद प्रस्तावावरील चर्चेत सहभागी होताना शिवसेना नेते-खासदार संजय राऊत यांनी राष्ट्रपतींचे भाषण हे सरकारचा आवाज असतो मात्र, सरकारने जनेताही आवाज ऐकायला शिकले पाहिजे, असा टोला लगावताना त्यांनी देशातील भयंकर परिस्थितीकडे सभागृहाचे लक्ष वेधले. सर्वात मोठे बजेट भाषण दिल्याने अर्थव्यवस्था सुधारणार नाही, असा खरमरीत टोला खासदार राऊत यांनी यावेळी लगावला.

जम्मू-कश्मीरमध्ये मला शाळा उघडता येईल काय…
कलम 370 हटविल्यानंतर जम्मू-कश्मीरमध्ये रामराज्य अवतरल्याचा आभास निर्माण करण्यात आला होता, मात्र आज तिथली काय परिस्थिती आहे. जम्मू-कश्मीरमध्ये महाराष्ट्राचे 14 जवान गेल्या तीन महिन्यांत शहीद झाले. किती उद्योग केले, किती जणांना तिकडे रोजगार मिळाले. आज तिथे शाळा काढायची मला जमीन द्या, आहे का सरकारची तयारी, असा सवाल खासदार संजय राऊत यांनी यावेळी उपस्थित केला.

‘कॅग’ रिपोर्टच्या मिरच्या सरकारला झोंबल्या
पाकिस्तानला हरवू अशा गर्जना आपल्याकडे नेहमीच केल्या जातात, मात्र देशातील जवानांची अवस्था काय आहे. जवानांना आर्थिक मंदीचा सर्वाधिक फटका बसला आहे. सीमेवर छातीचा कोट करून देशाचे रक्षण करणाऱया जवानांना दोन महिन्यांपासून पगार नाही. तीन हजार पाचशे रुपयांचा महागाईचा भत्ता नाही, नऊ हजार फूट उंचीवर देशाचे रक्षण करणाऱया जवानांना स्नो बूट नाही. सर्वात आधी जवानांना रेशनभत्ता द्या, जाकीट द्या. विकास, विश्वासाच्या बाता चालत राहतील, असे राऊत यांनी सुनावताच सभागृहात एकच गोंधळ उडाला. सत्ताधारी पक्षाच्या खासदारांना राऊत यांनी सभागृहासमोर आणलेले वास्तव चांगलेच झोंबले. त्यांनी राऊत यांच्या भाषणाला विरोध करण्याचा प्रयत्न केला. यावेळी मे जे काही बोलत आहे ते माझ्या मनानुसार नाही किंवा हा तुकडे तुकडे गँगचा रिपोर्ट नाही तर ‘कॅग’चा रिपोर्ट आहे, असे खासदार संजय राऊत यांनी सुनावल्यानंतर सत्ताधाऱयांचे चेहरे पडले.

सबका साथ सबका विश्वास
सबका साथ सबका विश्वास हे म्हणणे ठीक, पण वास्तवात काय वर्तन आहे, असा सवाल करत आमच्यासोबत (शिवसेना) गेल्या तीस वर्षांपासून साथ होती त्याचे काय झाले आणि पर्यायाने विश्वासाचे काय झाले हेही सर्वांना माहिती आहे, असा चिमटा खासदार राऊत यांनी काढल्यानंतर सभागृहात खसखस पिकली.

आपली प्रतिक्रिया द्या