
सामना प्रतिनिधी । संभाजीनगर
शहाबानो प्रकरणात तत्कालीन पंतप्रधान राजीव गांधी यांनी न्यायालयाचा निकाल बदलला. आता अॅट्रॉसिटी प्रकरणातही निकाल बदलण्यात आला. मग अयोध्येतील प्रभू रामचंद्रांच्या मंदिरासाठी हाच निकष का लावला जात नाही? गेली कित्येक वर्षे ऐकतोय, मंदिर वहीं बनायेंगे! अरे, कधी होणार? हिंदुत्वाच्या धाग्याने आम्ही तुम्ही एकत्र बांधले गेलो. हिंदुत्वाच्या शिडीवरूनच तुम्ही सत्तेच्या खुर्चीवर गेलात. सत्ता मिळाली, चार वर्षे झाले. कुठे गेले तुमचे हिंदूत्व? हिंदुत्व नेमके कशासाठी? मंदिरासाठी की सत्तेसाठी? असा खडा सवाल आज शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केला. पंतप्रधान नरेंद्र मोदींना हाच जाब विचारण्यासाठी 25 नोव्हेंबरला अयोध्येत जात असल्याचेही त्यांनी ठणकावून सांगितले.
संभाजीनगर, बीड व लातूर येथे आज शिवसेना गटप्रमुखांचे दणदणीत मेळावे झाले. या मेळाव्यात बोलताना शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी भाजप सरकारची पिसेच काढली. पंतप्रधान नरेंद्र मोदी ‘मन की बात’ करतात. त्यांच्या मनातले ऐकण्यासाठी लोक जमतात. पंतप्रधान आहेत, कशाला खोटे बोलतील, असा भाबडा समज या लोकांचा असतो. पण खोटे बोलण्याची, थापा मारण्याचीही काही मर्यादा असते? अशाच एका कार्यक्रमात शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट झाल्याची लोणकढी यांनी मारली. ज्या महिलेची साक्ष काढली, तिच्याकडून पत्रकारांनी माहिती घेतली अन् हे उघडे पडले. असा यांचा कारभार!
कुठे गेली कर्जमाफी?
मला कोणतेही राजकारण करायचे नाही. कर्जमाफी इतक्या लोकांना मिळाली, तितक्या लोकांना मिळाली, अशा जाहिरातींचा सध्या भडिमार आहे. शेतकरी म्हणून सांगा, कर्जमाफी कुणा कुणाला मिळाली? हमी भाव मिळाला का? उद्धव ठाकरे यांनी असा सवाल करताच अख्ख्या सभेतील उपस्थितांनी हात वर करून ‘नाही! असे उत्तर दिले. सरकारी आकडा येतोय, हजारो कोटींची कर्जमाफी दिली म्हणून. कर्जमाफीला पैसे दिले म्हणून विकास थांबला असे सरकार म्हणते. आता सांगा, शेतकरी खोटे बोलताहेत का सरकार? कुणाच्या बोडक्यावर मारायचीय तुमची आकडेवारी? सगळ्या राज्यात हाच प्रश्न विचारतोय, कुठे गेली कर्जमाफी? उज्ज्वला योजनेचा लाभ म्हणे 5 कोटी महिलांना झाला. चांगले आहे झाला असेल तर. सिलिंडरचे अनुदान कुठे गेले? ज्यांना या योजनेतून सिलिंडर मिळाले त्यांच्या खात्यात अनुदान जमा होते का? पण उत्तर कोणी देणार नाही. सगळ्या पेट्रोलपंपावर मोदींचे हसरे फोटो! हेच थोतांड आता उघडे पाडणार, असे उद्धव ठाकरे यांनी यावेळी बजावले.
आटा महाग, डाटा फुकट!
सध्या आटा महाग, डाटा फुकट अशी परिस्थिती असल्याचा टोला उद्धव ठाकरे यांनी लगावला. बीड येथे एका शेतकऱ्याची भेट घेतली. त्याच्या शेतातील कापूस उद्ध्वस्त झाला आहे. एवढेच काय कडुलिंबाला कीड लागली आहे. काँग्रेसच्या काळात नव्हते असे प्रकार. जे 60 वर्षांत झाले नाही ते यांच्या चार वर्षाच्या काळात घडले. सरकार म्हणून काय करताय? कोणती जबाबदारी पार पाडलीत? असा घणाघाती सवाल उद्धव ठाकरे यांनी केला.
दुष्काळसदृश परिस्थिती, आभारसदृश धन्यवाद
महाराष्ट्रात दुष्काळाने हातपाय पसरले आहेत. परिस्थिती अत्यंत भयावह आहे. आज मंत्रिमंडळाच्या बैठकीत सरकारने 180 गावांत दुष्काळसदृश परिस्थिती असल्याचे जाहीर केले, त्यामुळे त्यांना आभारसदृश धन्यवाद! असा शालजोडीतला उद्धव ठाकरे यांनी हाणला. केंद्राचे पथक येणार, पाहणी करणार, त्यानंतर दुष्काळ जाहीर होणार. त्यामुळे जेव्हा पूर्ण दुष्काळ जाहीर कराल तेव्हा आभार मानेन, असेही ते म्हणाले.
आश्वासनांचा पाऊस पडतोय!
महाराष्ट्रात दुष्काळ आहे? कुठे आहे दुष्काळ? सरकार तर रोज आश्वासनांचा पाऊस पाडते आहे. पण सरकारच्या या थापांनी गोरगरिबांचे पोट भरणार नाही. सत्तेत राहून मी सरकारच्या विरोधात बोलतो असे म्हणतात. होय, मी बोलतो, बोलणार आणि बोलणार! मी सरकारच्या विरोधात नाही, तर जनतेच्या बाजूने बोलतो, असे उद्धव ठाकरे यांनी ठणकावून सांगितले. कुणाला काय वाटते याची मला पर्वा नाही. मी जनतेला बांधील आहे, सरकारला नाही, असेही त्यांनी बजावले. सरकार काम करत असेल तर नक्कीच वाहवा करणार, पण काम करत नसेल तर याच सरकारला ‘चालते व्हा’ असे ठणकावून सांगणारच, असे उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केले.
दैवत बदलणारी अवलाद तुमची
निवडणूक आली म्हणून शिवसेनेला राम मंदिराची आठवण झाली असे कुणीतरी म्हणाले. आमचे दैवत एकच, शिवसेनाप्रमुख! यांनी आतापर्यंत किती दैवते बदलली? दैवत बदलणारी अवलाद तुमची! तुम्ही आम्हाला हिंदुत्वाचा पाठ शिकवू नये, तो आमच्या रक्तात आहे, असे खडे बोल उद्धव ठाकरे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भ़जबळ यांना सुनावले. आणि तुमच्यापेक्षा रामाची आठवण बरी, असे ते म्हणाले. जामीनावर सुटले, पण जमिनीवर आले नाही, असा भीमटोलाही उद्धव ठाकरे यांनी भ़जबळांना नाव न घेता लगावला.
म्हणूनच ते हिंदुहृदयसम्राट
होय! शिवसैनिकांनी बाबरी पाडली! असे म्हणणारा एकच माणूस होता- शिवसेनाप्रमुख! त्यांचा शब्द म्हणजे शब्द! नुसता अंगार! म्हणूनच ते हिंदुहृदयसम्राट होते. हा भगवा त्यांनीच आमच्या हाती दिला आहे. हा भगवा पेलण्यासाठीसुद्धा मनगटात ताकद असावी लागते, ऐऱ्यागैऱ्याचे ते काम नाही. नितीन गडकरी म्हणाले, निवडून येणार हे आम्हाला कुठे माहिती होते म्हणून आम्ही बोलत गेलो, जुमलेबाजी करत गेलो. विलासरावही म्हणाले होते, प्रिंटिंग मिस्टेक झाली म्हणून! स्पष्टवक्तेपणा वेगळा. पण याला निर्लज्जपणा म्हणतात. हा कोडगेपणा आहे.
राम मंदिरही जुमला आहे का?
निवडणूक जिंकण्यासाठी जुमलेबाजी करावी लागते हे खरे असेल तर राम मंदिराचा मुद्दाही जुमलेबाजीच आहे का? याचे उत्तर यांना द्यावेच लागेल, असे उद्धव ठाकरे यांनी बजावले. कित्येक वर्षे झाली ऐकतोय, निवडणुका आल्या की राम मंदिर, कलम 370 आणि समान नागरी कायद्याचे ढोल वाजतात. दोन खासदारांवरून बहुमतावर गेले. राम मंदिर कुठे आहे हे आम्हाला कुठे माहिती होते? तुम्हीच तर वारंवार सांगितले, ‘मंदिर वहीं बनायेंगे’चा नारा दिला होतात ना? कित्येक शिवसैनिक गेले होते अयोध्येला. मुलायम सरकारने कारसेवकांना मारले. गोळ्या घातल्या. ज्यांच्या उरात थोडी धुगधुगी होती त्यांच्या गळ्यात दगड बांधून शरयूत पेâकले. शरयू कारसेवकांच्या रक्ताने लालेलाल झाली. रामनामाचा जप करीत सत्ता मिळवलीत आणि खुर्ची मिळाली की रामाला विसरले. हिंदुत्व हाच आमचा धागा होता. याच विचारावर आम्ही एकत्र आलो. हिंदुत्व हे मंदिरासाठी की सत्तेसाठी हाच जाब मोदींना विचारण्यासाठी 25 नोव्हेंबरला अयोध्येत जाणार असल्याचे उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केले. 2019 मध्ये मोदी पंतप्रधान होणार नाहीत, असे भाकित शरद पवार यांनी केले आहे. मोदी पंतप्रधान होणार नसतील तर मंदिर कोण बांधणार? त्यामुळे आता नाही तर मग केव्हा मंंदिर बांधणार? एकदाचे खरे काय ते सांगून टाका, असे उद्धव ठाकरे यांनी सुनावले.
सुभाषबाबू, पटेल कसे काय आठवले?
नेहमीच गांधी-नेहरू घराण्यावर दोष देऊन कसे चालेल? आता तुम्हाला सुभाषबाबू आठवले. सरदार पटेल आठवले. पटेल पंतप्रधान असते तर कश्मीर प्रश्न चिघळला नसता! पटेल नसते तर मराठवाडाही स्वतंत्र झाला नसता! मी म्हणतो, स्वातंत्र्यवीर सावरकर पंतप्रधान झाले असते तर जगाच्या नकाशावर पाकिस्तान दिसलाच नसता! या सगळ्या जर तरच्या कल्पना आहेत. निवडणुका होतील. कुणीतरी पंतप्रधान होईल. पण देशाच्या अपेक्षांचे काय? त्या कोण पूर्ण करणार? त्यांनी आमचा एक सैनिक मारला तर आम्ही त्यांचे दहा मारू, असे प्रचारकी थाटातले भाषण ठीक आहे, पण कधी शिकवणार पाकिस्तानला धडा? असा खडा सवाल उद्धव ठाकरे यांनी यावेळी केला.
तुमचे बारा वाजलेत, तुमचा पक्ष सांभाळा
आम्ही अयोध्येत जाणार म्हटल्याबरोबर राष्ट्रवादी काँग्रेसच्या पोटात मुरडा आला. अयोध्येतच जातोय, बारमध्ये नाही! बारमध्ये जाणार म्हटल्यावर हे म्हणाले असते… आम्ही येतो, आम्ही येतो! अडगळीत गेलेल्या लोकांनी आम्हाला शिकवू नये, तुमचे बारा वाजलेत, तुमचा मोडकळीला आलेला पक्ष अगोदर सांभाळा, असे खडे बोल यावेळी उद्धव ठाकरे यांनी राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांना सुनावले. दुष्काळ आहे. महाराष्ट्रातली धरणे, तलाव कोरडे पडलेत. अजित पवारांना फिरकू देऊ नका! असे उद्धव ठाकरे यांनी म्हणताच एकच हशा पिकला.
शिवसेनेचा मुख्यमंत्री करणारच!
पिचलेल्या महाराष्ट्राला सुखाचे दोन क्षण देण्यासाठी मला शिवसेनेची सत्ता आणायची आहे. शिवसेनेचा मुख्यमंत्री करणार म्हणजे करणारच! असा वङ्कानिर्धार उद्धव ठाकरे यांनी बोलून दाखवताच उपस्थित हजारो शिवसैनिकांनी त्यांना टाळ्यांच्या गजरात साद दिली. मला महाराष्ट्राला कोणतेही खोटे स्वप्न दाखवायचे नाही. मला सत्तेची, खुर्चीची हाव नाही. जे काही करायचे आहे ते तुमच्यासाठी, असेही उद्धव ठाकरे यावेळी म्हणाले.
गटप्रमुख हाच निवडणुकीचा आत्मा
गटप्रमुखांच्या मेहनतीवरच शिवसेनेने आतापर्यंत निवडणुकीचे मैदान मारले आहे. गटप्रमुख हा निवडणूक प्रक्रियेचा आत्मा आहे. येणारा काळ अतिशय खडतर आहे. गटप्रमुखांनी मतदार याद्या, मतदारांशी आतापासूनच संपर्वâ साधावा, असे आदेश यावेळी उद्धव ठाकरे यांनी दिले. भगवा फडकावण्याचे बघितलेले स्वप्न तुमच्या जोरावरच प्रत्यक्षात उतरणार आहे. तेव्हा घराघरात जा. सर्वसामान्यांचे प्रश्न समजून घ्या. त्यांच्या अडचणी समजून घ्या. आमच्यापर्यंत पोहोचवा. निवडणुकीचे धोरण ठरवताना गटप्रमुखांचे मतच महत्त्वाचे आहे. हे शिवसैनिकांचे जाळेच सर्वसामान्यांच्या आशेचे मोठे वेंâद्र आहे. खरे तर हा मेळावा हॉलमध्ये घ्यायचा होता. गुप्त बोलायचे होते. पण आपल्याकडे भिंती नाहीत. पण छप्पर आहे. गोरगरिबांच्या डोक्यावर छप्पर देण्याचे काम करतो म्हणूनच आज 52 वर्षानंतरही शिवसेना तरुण आहे, असे उद्धव ठाकरे म्हणाले.
शेतकऱ्यांनो, घाबरू नका, शिवसैनिक तुमच्या पाठीशी
‘‘दुष्काळ अक्राळविक्राळ रूप धारण करतोय. सरकार काय करतेय मला माहिती नाही. पण अशा या बिकट परिस्थितीत माझा शिवसैनिक शेतकऱ्यांच्या खांद्याशी खांदा लावून उभा राहील. शेतकऱ्यांनो, दुष्काळाला घाबरू नका, अध्र्या रात्री फक्त आवाज द्या, शिवसैनिक तुमच्या पाठीशी आहे!!’’ असा दिलासा आज शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी दिला. चारा, पाणी, अन्नधान्य आणि त्याबरोबरच दुष्काळाशी मुकाबला करण्यासाठी हिंमत घेऊन शेतकऱ्यांबरोबर उभे राहा, असे आदेशच यावेळी उद्धव ठाकरे यांनी शिवसैनिकांना दिले.

































































