आमचं ठरलंय तसंच होणार, पारदर्शकपणे सत्तास्थापन करणार – उद्धव ठाकरे

5642

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचे निकाल लागल्यानंतर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शिवसेना भवन येथे पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेत त्यांनी महाराष्ट्रातील जनतेचे आभार मानले. तसेच सत्तास्थापनेसाठी भाजपसोबत जो फॉर्म्युला ठरला होता तसंच होईल हे देखील यावेळी स्पष्ट केले. ‘लोकसभेच्या वेळी जेव्हा युती झाली तेव्हा 50-50 चा फॉर्म्युला ठरला होता. जागा वाटपही 144-144 ठरले होते. मात्र जागावाटपात मी भाजपची अडचण समजून घेतली होती. मी कमी जागांवर तडजोड केली. मात्र प्रत्येक वेळी मला तसं करणं शक्य नाही. मला माझा पक्ष देखील पुढे वाढवायचा आहे. त्यामुळे आता दोन्ही पक्षांच्या नेत्यांनी एकत्र बसून ठरलेल्या फॉर्म्युलाप्रमाणेच पारदर्शक निर्णय घेत सत्तास्थापनेसाठी जनतेसमोर येऊ’ असे उद्धव ठाकरे यांनी यावेळी सांगितले.

‘महाराष्ट्राच्या विधानसभेचा निकाल जाहीर झाले आहेत. महाराष्ट्राच्या तमाम जनतेचे आभार मानतो. जनतेने कोणत्याही दडपणाला बळी न पडता शिवरायांच्या महाराष्ट्राला शोभेल असे मतदान त्यांनी केले आहे. निवडणूक म्हटल्यावर हार जीत असतेच. महायुतीला सत्ता स्थापन करता येतील करतील एवढ्या जागा महायुतीला दिल्या आहेत. अत्यंत जागरुकपणाने जनतेने मतदान केलं आहे. मला अभिमान आहे की त्यांनी लोकशाही जिवंत ठेवली. काही गोष्टी अशा असतात की लोकं गृहित धरून चालायला लागतात तेव्हा त्याचे पाय जमीनीवर ठेवण्याचे काम महाराष्ट्राती जनतेने कायम केले आहे. हा ‘जनादेश’ सर्व राजकीय पक्षांचे डोळे उघडणारा आहे. आता अत्यंत जबाबदारीने सत्ताधाऱ्यांना काम करावे लागेल. महाराष्ट्रातल्या जनतेच्या रोजच्या जीवन मरणाचे प्रश्न आहेत त्यासाठी काम करावे लागेल. जनतेसमोर नतमस्तक होऊन काम करावं लागेल’, अशा शब्दात उद्धव ठाकरे यांनी जनतेचे आभार मानले आहेत.

‘जेव्हा राज्यकर्ते किंवा नेत्यांचे डोळे बंद होतात तेव्हा महाराष्ट्रातील जनता त्यांचे डोळे उघडते. महाराष्ट्रातल्या जनतेने आता डोळ्यात अंजन घातलं आहे. त्यामुळे जर आता डोळ्यात अंजन जाऊनही आम्ही मुख्यमंत्रिपदासाठी भांडत राहिलो तर अंजनापेक्षाही तीव्र उपाययोजना महाराष्ट्रातील जनता करेल. त्यामुळे आता लवकरात लवकर दोन्ही पक्षातील ज्येष्ठ नेते एकत्र बसून जो फॉर्म्युला ठरला होता तो अत्यंत पारदर्शकपणे ठरवून सत्तास्थापन करू. गरज लागली तर अमित शहा देखील येतील. त्यावेळी जे ठरलं होतं त्याची भाजपला आठवण करून देऊ’, असे उद्धव ठाकरे यांनी सांगितले.

आदित्य ठाकरे यांच्या विजयासाठी जनतेचे मानले आभार

शिवसेना नेते व युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी वरळी मतदारसंघातून दणदणीत विजय मिळवला. या विजयासाठी उद्धव ठाकरे यांनी जनतेचे आभार मानले ‘जनता आदित्यला प्रेम देतेय, आशीर्वाद देतेय त्यासाठी मी जनतेसमोर नतमस्तक होतोय. असेच आशीर्वाद कायम आमच्यासोबत असू द्या’, अशा शब्दात उद्धव ठाकरे यांनी जनतेचे आभार मानले.

आपली प्रतिक्रिया द्या