राज्यभरात शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी शिवसेनेचा तहसील कार्यालयांवर मोर्चा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

अवकाळी पावसामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळालीच पाहिजे, शिवसेना जिंदाबाद अशा जोरदार घोषणा देत सोमवारी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशानुसार शिवसेनेने राज्यभरातील तहसीलदार कार्यालयावर मोर्चा काढला. अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले असून ओला दुष्काळ जाहिर करा, शेतकऱ्यांना हेक्टरी 25 हजार रुपयांची मदत जाहीर करण्याची मागणी करण्यात आली.

रत्नागिरी –

ratnagiri
अवकाळी पावसामुळे भातशेतीचे प्रचंड नुकसान झाले असल्याने ओला दुष्काळ जाहीर करा. शेतकऱ्यांना हेक्टरी 25 हजार रुपये आणि बागायतदारांना 50 हजार रुपये नुकसान भरपाई द्या अशी मागणी शिवसेनेने केली आहे. यावेळी शिवसेनेचे सहसंपर्कप्रमुख राजेंद्र महाडिक, जिल्हाप्रमुख विलास चाळके, तालुकाप्रमुख आणि प्रभारी नगराध्यक्ष प्रदिप साळवी, क्षेत्रप्रमुख प्रमोद शेरे,समाजकल्याण सभापती प्रकाश रसाळ, उपजिल्हाप्रमुख संजय साळवी, शहरप्रमुख बिपीन बंदरकर, शहर संघटक प्रसाद सावंत,महिला शहर संघटक मनिषा बामणे, नगरसेवक राजन शेट्ये यासह शेकडो शिवसैनिक उपस्थित होते.

माढा –

madha
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशानुसार माढा शिवसेनेच्या वतीने शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसह सरसकट पिकांचे, फळबागाचे पंचनामे करावेत तसेच राज्यपालांनी जाहीर केलेली तुटपुंजी असून शासनाकडून शेतकऱ्यांना अधिक मदतनिधी मिळावा या प्रमुख मागणीसाठी तहसील कार्यालयावर जिल्हा समनव्यक शिवाजीराव सावंत यांच्या नेतृत्वाखाली धडक मोर्चा काढला.

हातकणंगले –

hatkanangle
राज्यकर्त्यासाठी मध्यरात्री काम करणाऱ्या प्रशासनाने पाच महिने ऊलटून गेले तरीही अद्याप ‘पंचनामे करण्यात दंग असलेल्या शासनाने पंधरा दिवसात कोल्हापूर जिल्हा ओला दुष्काळ जाहीर करावा, तसेच जुलै ते आक्टोबर कालावधीतील अतिवृष्टीने बाधीत शेतकऱ्यानां हेक्टरी 25 हजार रूपये नुकसान भरपाई मिळावी यासाठी कोल्हापूर जिल्हा शिवसेनेने सोमवारी हातकणंगले तहसिल कार्यालयावर धडक दिली.

परतूर –

partur
राज्यपाल यांनी जाहीर केलेली मदत अत्यंत तुटपुंजी असून हेक्टरी 25 हजाराची मदत शेतकऱ्यांना तातडीने द्यावी अशी मागणी जालना जिल्ह्यातील परतूर तालुका शिवसेनेने तहसीलदार यांचेकडे निवेदनाद्वारे केली आहे.

जालना –

jalna
परतीच्या पावसाने पिकांचे प्रचंड नुकसान झाले असून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तात्काळ भरीव मदत द्यावी, या मागणीचे निवेदन जालना जिल्हा शिवसेनेच्या वतीने माजी राज्यमंत्री अर्जुनराव खोतकर, जिल्हाप्रमुख भास्करराव अंबेकर यांच्या उपस्थितीत जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले.

कराड –

karad
अतिवृष्टी,व अवकाळी पावसामुळे कराड तालुक्यातील शेती पिकांचे प्रचंड मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याने शेतकऱ्यांच्या हाता तोंडाशी आलेला घास हिरावला गेल्याने शेतकरी पूर्णपणे अडचणीत सापडला आहे. मोडून पडलेल्या शेतकऱ्याला पुन्हा उभे करण्यासाठी सरकारी पातळीवरुन त्वरीत कार्यवाही कार्यवाही होणे अपेक्षित आहे. त्यासाठी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशानुसार शिवसेनेच्यावतीने मागण्याचे निवेदन देण्यात आले आहे.

उरण –

uran
अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांना झालेल्या पीकांची नुकसान भरपाई देण्यात यावी, पीक विम्याची रक्कम, संपूर्ण कर्जमाफी, अंतर्गत शेतकर्‍यांना तातडीने मदत मिळणे,पिकांना व फळबागांना हेक्टरी 25 हजार रुपये तसेच मच्छीमार करणारे कोळी बांधवांनाही नुकसान भरपाईसह नवीन बोटी बांधण्यास आर्थिक मदत म्हणून सानुग्रह अनुदान देण्यात यावे शेतकरी आणि मच्छीमारांच्या या विविध मागण्यांसाठी उरण तहसील कार्यालयावर शिवसेनेच्यावतीने सोमवारी धडक मोर्चा काढण्यात आला.

लातूर –

latur
अवकाळी पावसाने लातूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झालेले आहे. शेतकऱ्यांना राज्यपालांनी केवळ हेक्टरी 8 हजार रुपयांची तुटपुंजी मदत जाहिर करण्यात आली. पैसे येऊनही ते शेतकऱ्यांना वाटप करण्यात आलेले नाही. ही रक्कम तातडीने शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्यात यावी, शेतकऱ्यांना हेक्टरी 50 हजार रुपयांची मदत तात्काळ देण्यात यावी, शेतकऱ्यांचे विद्युत बील माफ करण्यात यावे, बँकांची थकीत कर्जाची वसुली थांबवण्यात यावी या मागण्यांसाठी शिवसेनेच्या वतीन निदर्शन करण्यात आली.

उदगीर –

udgir
शेतकऱ्यांना नुकसान भरपाई हेक्टरी 25 हजार देण्यात यावे आणि सरसकट कर्जमाफी देण्यात यावे, कुठलाच निकष न लावता पूर्ण पीक विमा मिळावे या मागणीचे निवेदन तहसीलदारांना शिवसेनेच्या वतीने देण्यात आले. यावेळी विधानसभा संपर्कप्रमुख अ‍ॅड. श्रीनिवास क्षीरसागर, उपजिल्हाप्रमुख रामचंद्र आदावळे, तालुकाप्रमुख चंद्रकांत टेंगेटोल आदी पदाधिकारी उपस्थित होते. यासह औसा, अहमदपूर, चाकूर तहसील कार्यालयातवर मोर्चा नेत शिवसेनेने निवेदन दिले.

आष्टी –

ashti
ऑक्टोबर महिन्यामध्ये झालेल्या परतीच्या पावसाने शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. त्यामुळे शेतकरी संकटात सापडला आहे या शेतकऱ्यांना हेक्टरी 25 हजाराची तात्काळ नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी आष्टीचे नायब तहसीलदार प्रदिप पांडुळे यांच्याकडे आष्टी तालुका शिवसेनेच्या वतीने लेखी निवेदनाद्वारे करण्यात आली.

देवरूख – 

dev

नुकसानग्रस्त शेतकर्‍यांना गुंठ्याला 80 रूपये देऊन राज्यपालांनी क्रुर चेष्टा केली आहे. नुकसान किती आणि भरपाई किती यापेक्षा ती भरपाई न दिलेलीच बरी, राज्यपालांनी शेतकर्‍यांसह मच्छिमारांना भरभरून नुकसान भरपाई द्यावी अन्यथा शिवसेना आपले आंदोलन तीव्र करेल असा इशारा माजी राज्यमंत्री रविंद्र माने यांनी दिला.