
सामना प्रतिनिधी । कोपरगाव
कोपरगाव तालुक्यातील पोहेगाव येथील पासधारक शालेय विद्यार्थ्यांना वेठीस धरणाऱ्या कोपरगाव बस आगाराच्या मनमानीला लगाम घालण्यासाठी शिवसेना रस्त्यावर उतरली. शिवसेनेच्या नितीन औताडे यांच्या मार्गदर्शनाखाली बुधवारी सकाळी विद्यार्थी-विद्यार्थिनींसह ग्रामस्थांनी बस रोखून धरल्या. शिवसेनेच्या या जोरदार दणक्यानंतर बस प्रशासन ताळ्यावर आले. लेखी आश्वासन दिल्यानंतर आंदोलकांनी बस सोडल्या. विद्यार्थ्यांना वेठीस धरण्याचा कोणी प्रयत्न केला तर त्याची गय केली जाणार जाणार नाही असा सज्जड इशारा औताडे यांनी यावेळी दिला.
कोपरगाव संगमनेर महामार्गावर कोपरगाव बस आगाराच्या जवळपास सात आठ गाड्या अडवल्यानंतर बस आगाराचे आगार व्यवस्थापक विठ्ठल केंगारकर, सहाय्यक वाहतूक निरीक्षक डी बी जगताप, आगार सहाय्यक श्री लबडे घटनास्थळी दाखल झाले. बस बाबत लेखी आश्वासन दिल्याशिवाय एकही बस हलू दिली जाणार नाही असा पवित्रा नितीन औताडे व ग्रामस्थांनी घेतल्यामुळे त्यांची पुरती तारांबळ उडाली. जवळपास तीन तास हे आंदोलन चालल्यानंतर आगार व्यवस्थापक श्री चौधरी यांच्या सूचनेनुसार स्थानक प्रमुख विठ्ठल केंगारकर यांनी यापूर्वी सुरू असलेल्या सर्व बस पोहेगाव येथे थांबल्या जातील, सकाळीची अतिरिक्त बस पूर्ववत चालू होईल व संध्याकाळी पाच वाजता कोपरगाव वरून पोहेगाव करिता वाढीव बस सुरु करण्यासाठी मंजुरी घेतली जाईल असे लेखी आश्वासन दिल्यानंतर हे आंदोलन मागे घेण्यात आले.



























































