शिवसेनेच्या रास्ता रोको आंदोलनास शेतकऱ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । जळकोट

वंचित असलेल्या सहा गावांसह अन्य सर्व शेतकऱ्यांना पीक वीमा मिळावा, या मागणीसाठी जळकोट तालुका शिवसेनेच्या वतीने वांजरवाडा (ता.जळकोट ) येथे आयोजित करण्यात आलेल्या रास्ता रोको आंदोलनास तालुक्यातील शेतकऱ्यांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. या आंदोलनाची तीव्रता पाहून तहसीलदार, जळकोट व तालुका कृषी अधिकारी, जळकोट यांच्याकडून १० जुलै पर्यंत शेतकऱ्यांना वीमा वाटप करण्याचे संयुक्त लेखी आश्वासन देण्यात आल्याने तूर्त हे आंदोलन थांबवण्यात आले.

येत्या १० जुलै पर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यावर पीक वीमा जमा नाही झाल्यास पालकमंत्री व स्थानिक आमदारांना तालुक्यात फिरु देणार नाही, असा इशारा शिवसेनेचे तालुकाप्रमुख संग्राम टाले यांनी आपल्या भाषणातून दिला. शिवसेनेचे लातूर जिल्हा उपप्रमुख प्राचार्य रामचंद्र आदावळे यांनी यापुढील आंदोलन हे तहसील व तालुका कृषी अधिकारी कार्यालयास टाळे ठोकण्याचे असेल, असा खणखणीत इशारा दिला.

या आंदोलनात शिवसेनेचे जिल्हाप्रमुख नामदेव चाळक, महिला जिल्हा संघटिका सुनीता चाळक, उप जिल्हाप्रमुख प्राचार्य रामचंद्र आदावळे, विधानसभा संघटक श्रीमंत सोनाळे, तालुका प्रमुख संग्राम टाले, माधव भुरे, शंकर धोंडापुरे, धनंजय भांगे, दिगांबर सोमासे, अनील ढोबळे, रघुनाथ केंद्रे, मुक्तेश्वर येवरे, उमाकांत इमडे, बालाजी ठाकूर, वडगावचे चेअरमन मुंडे, धामणगावचे चेअरमन राजाराम चट, उमरगा (रेतू ) चे चेअरमन श्रीहरी ढोबळे, उमरदराचे चेअरमन केंद्रे यांच्यासह तालुक्यातील असंख्य शिवसैनिक व शेतकरी सहभागी झाले होते.