संसदेच्या प्रांगणातही ‘पहले मंदिर फिर सरकार’च्या घोषणा, शिवसेनेने परिसर दणाणून सोडला

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । नवी दिल्ली

अयोध्येत प्रभू श्रीरामचंद्राचे मंदिर उभारण्याचे वचन देऊन सत्तेत आलेल्या भाजप सरकारने या प्रश्नाला बगल दिली आहे. यावर शिवसेनेने जोरदार आसूड ओढले असून ‘हर हिंदू की यही पुकार, पहले मंदिर फिर सरकार’ अशा घोषणांनी संसदेचा सारा परिसर दणाणून सोडला. संसदेच्या प्रांगणात सुरू असलेल्या शिवसेनेच्या या जोरदार आंदोलनाची दखल जगभरातील मीडियाने घेतली.

रामजन्मभूमीवर राममंदिर निर्माण करू असे वचन भाजपने दिले आहे. लोकसभा निवडणुकीच्या वचननाम्यात देखील, ‘राममंदिर निर्माणासाठी कायद्याच्या कक्षेत राहून शक्य ते सर्व पर्याय तपासू’ असं वचन देण्यात आलं होतं. मात्र सत्ता आल्यानंतर भाजप सरकारनं हा मुद्दा बाजूला ठेवला होता. यावर शिवसेनेने वेळोवेळी टीका केली आणि 24-25 नोव्हेंबर रोजी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी स्वत: अयोध्येत रामजन्मभूमीचे दर्शन घेतले आणि मोदी सरकारला प्रश्न केला होता. या सगळ्याची आठवण करून देण्यासाठी शिवसेना खासदारांनी दिल्लीत सुरू असलेल्या संसदेच्या हिवाळी अधिवेशनावेळी प्रांगणात जोरदार आंदोलन केले. यावेळी गगनभेदी घोषणा करण्यात आल्या.

हिंदू समाजाला भाजपने आणि हिंदुत्ववादी संघटनांनी राममंदिर निर्माणाचे वचन दिले होते. रामाच्या आशीर्वादाने सत्ता आली आहे. मात्र सत्ता येऊन चार वर्ष झाल्यानंतर देखील राममंदिर उभारण्यासाठी कोणतेही प्रयत्न झालेले नाही. सत्ताधारी हिंदुत्वावादी संघटनांनी राममंदिरासाठी अध्यादेश काढून वचनपूर्ती करणे आवश्यक आहे, अशी प्रतिक्रिया शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी यावेळी दिली.