
सामना प्रतिनिधी । पुणे
धरणात पुरेसा पाणीसाठा असताना नियोजनाअभावी ऑक्टोबर महिन्यातच पाणीकपात केली आहे. त्यामुळे सत्ताधारी भाजप कपाळकरंटे आहे, अशी टीका शिवसेनेने केली आहे. पुणेकरांवर लादलेली पाणीकपात रद्द करा, अशी मागणीही केली.
पुणे महापालिकेने 1997 साली साडेअकरा टीएमसी पाणीसाठा मंजूर केला आहे. त्यावेळी शहराची लोकसंख्या 22 लाख होती. त्यानंतर पालिकेत 23 गावे समाविष्ट झाली आहेत. त्यामुळे पालिकेने पाणीसाठा वाढवून देण्याची मागणी केली आहे; पण त्याकडे पाटबंधारे खात्याने दुर्लक्ष केले आहे. गावांना पाणी देण्यास आमचा विरोध नाही; पण पालिकेला पाण्याचा कोटा वाढवून मिळाला पाहिजे.
शहरामधील एक खासदार, आठ आमदारांपैकी पालकमंत्र्यांसह सहा आमदार पुणे महापालिकेचे नगरसेवक होते. त्यांना पुण्याचे पाणी वाढवून घेता आले नाही. जलसंपदा विभागाची दंडेली इतकी वाढली आहे की, त्यांना जलसंपत्ती प्राधिकरणाच्या मार्गदर्शनपर तरतुदी, महाराष्ट्र नियमन व नियमांचा विसर पडला आहे. जलसंपदा विभाग महापालिकेकडून वारेमाप बिल आकारणी करीत आहे. महापालिकेने 2.7 मीटर व्यासाच्या नलिकेमधून साडेसतरानळी येथील बेबी कॅनॉलमध्ये पाणी सोडण्यास सुरू केले. जलसंपदा विभागाकडेच 6.5 टीएमसी पाणी घेण्याची क्षमता नसल्याने त्यांच्याच सूचनेवरून पालिका उपलब्ध करून देते. या 6.5 टीएमसी पाण्याला महाराष्ट्र जलसंधारण प्राधिकरणाच्या नियमानुसार पाणीवाटप कराच्या 75 टक्के एवढाच दर घेण्याचे स्पष्ट नमूद केले आहे. जलसंपदा विभाग 6.5 टीएमसी पाण्यावर 25 टक्के जास्त का दर लावले? असा सवाल शिवसेनेचे पुणे सहसंपर्वâप्रमुख श्याम देशपांडे, उत्तम भेलके, गजानन थरकुडे, संदीप मोरे यांनी केला.
बंद नळाद्वारे बाष्पीभवन होते, असे सांगून जास्त बिल पाठविणे हा मनपाच्या तिजोरीवर दरोडा नाही काय? पुण्याचा पाणीकोटा तत्काळ वाढविण्यासाठी ते 16 टीएमसी करण्यासाठी तत्काळ सकारात्मक पावले सत्ताधाऱ्यांकडून उचलली जाण्याची गरज आहे. राज्यात सत्ताबदल होऊनही पाणीप्रश्न सुटलेला नाही. त्यामुळे ऑक्टोबरमध्येच पाणीसंकट भेडसावत आहे. त्यामुळे पुण्यावर लादलेली अनैसर्गिक पाणीकपात रद्द करा व पुरेसे पाणी द्या, अशी मागणी श्याम देशपांडे यांनी केली.

























































