बंगालच्या विजयोत्सवाचा अभिनंदन प्रस्ताव सभागृहात आणता मग नसरापूर प्रकरणाचा निषेध का नाही? शिवसेनेकडून पालिकेतील सत्ताधाऱ्यांचा समाचार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

राज्यात महिलांवरील वाढलेल्या अत्याचाराच्या घटनांमुळे राज्यात कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला असताना नसरापूर बालिका अत्याचार प्रकरणामुळे अवघ्या महाराष्ट्रात तीव्र संतापाची लाट उसळली आहे. असे असताना सत्ताधारी भाजपकडून पालिकेच्या महासभेत अत्याचाराच्या घटनेचा निषेध प्रस्ताव न आणता पश्चिम बंगालच्या विधानसभा निवडणुकीतील विजयाबद्दल अभिनंदनाचा प्रस्ताव आणला गेला, अशा शब्दांत पालिकेतील विरोधी पक्षनेत्या शिवसेनेच्या किशोरी पेडणेकर यांनी सत्ताधाऱ्यांचा चांगलाच समाचार घेतला.

सभागृह नेते भाजपचे गणेश खणकर यांनी सोमवारी महासभेत हा अभिनंदनाचा प्रस्ताव मांडला. याला शिंदे गटाकडूनही पाठिंबा देण्यात आला. यावर विरोधकांकडून तीव्र नाराजी व्यक्त करीत सत्ताधाऱयांना अत्याचाराच्या घटनेचे गांभीर्य वाटत नाही का, असा सवाल किशोरी पेडणेकर यांनी केला. निवडणुकीत हार-जीत होतच असते. मात्र राज्यात चिमुरडीवर अत्याचार करून दगडाने ठेचून हत्या केल्याचा गंभीर प्रकार घडला असताना त्यावर सत्ताधारी निषेध करीत नाहीत ही मोठी शोकांतिका असल्याचा टोलाही पेडणेकर यांनी सत्ताधाऱ्यांना लगावला.

सत्ताधाऱ्यांवर पुन्हा नामुष्की

सोमवारी पालिकेची सभा दुपारी 2 वाजता आयोजित करण्यात आली होती. मात्र 3 वाजत आले तरी सत्ताधाऱयांचे नगरसेवक सभागृहात आले नाहीत. त्यामुळे विरोधकांनी गणसंख्या पूर्ण होत असल्याचे सांगत सभागृह चालवण्याची मागणी केली. महापौर उपस्थित नसल्यामुळे पीठासीन अधिकारी म्हणून माजी महापौर यांना सभागृह चालवण्यास देण्याचा प्रस्ताव विरोधकांनी मांडला. त्यामुळे सत्ताधाऱयांची तारांबळ उडाली. या प्रकारामुळे दोन आठवडय़ांत विरोधकांसमोर निष्क्रिय ठरण्याची नामुष्की सत्ताधाऱयांवर आली. मागच्याच आठवडय़ात वडाळय़ातील भूखंड बिल्डरच्या घशात घालण्याचा सत्ताधाऱयांचा डाव शिवसेनेसह विरोधकांनी बहुमताच्या जोरावर उधळून लावला होता.