
कर्जत तालुक्यातील लव्ह जिहाद प्रकरणातून अल्पवयीन मुलीला फूस लावून पळवून नेल्याचा आरोप होत आहे. या प्रकरणातील आरोपीला तात्काळ अटक करून त्याच्यावर अपहरण व अत्याचाराचा गुन्हा दाखल करावा अशी मागणी शिवसेनेने (उद्धव बाळासाहेब ठाकरे) केली आहे. या मागणीसाठी सोमवारी नगर शहरातील डीएसपी चौकात शिवसेनेने (उद्धव बाळासाहेब ठाकरे) रास्ता रोको आंदोलन केले. आंदोलनामुळे वाहतूक कोंडी झाल्याने पोलिसांनी शिवसैनिकांना ताब्यात घेतले. यावेळी आंदोलकांनी पोलीस ठाण्यातही लव्ह जिहादविरोधात तुफान घोषणाबाजी केली. शिवसेनेचे (उद्धव बाळासाहेब ठाकरे) उपजिल्हा प्रमुख गिरिश जाधव यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले.
लव्ह जिहाद प्रकरणी पोलिसांनी प्रतिबंधात्मक कायदा करून त्याची त्वरित अंमलबजावणी करावी, अशी मागणी यावेळी आंदोलकांनी केली. या आंदोलनात जिल्हाप्रमुख राजेंद्र दळवी, युवा सेनेचे राज्य सहसचिव विक्रम राठोड, गौरव ढोने, उपशशहरप्रमुख अरुण झेंडे, संजय आव्हाड, प्रशांत पाटील, भगवान कोकने, अशोक पारधे, गिरिधर हांडे, प्रतीक बोडखे, अमोल पडाले यांच्यासह मोठ्या संख्येने शिवसैनिक सहभागी झाले होते.
दरम्यान, अपहरणानंतर अल्पवयीन मुलीच्या आई-वडिलांनी आरोपीच्या अटकेसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण सुरू केले असून आंदोलकांनी उपोषणकर्त्यांची भेट घेतली. तसेच उपजिल्हाप्रमुख गिरीश जाधव यांच्यासह शिष्टमंडळाने जिल्हाधिकारी सिद्धराम सालीमठ यांची भेट घेऊन या प्रकरणातील आरोपीला तत्काळ अटक करून कुटुंबाला न्याय द्यावा, अन्यथा तीव्र आंदोलन करण्याचा इशारा दिला.


























































