राज्यात अराजकासारखी स्थिती, सरकार आहे की नाही? संजय राऊत यांचा हल्लाबोल

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची 26 मार्च रोजी मालेगावात भव्य सभा होणार आहे. यासभेच्या निमित्ताने शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते, खासदार संजय राऊत हे आज नाशकात दाखल झाले. यावेळी पत्रकार परिषदेत बोलताना त्यांनी राज्यातील कायदा सुव्यवस्थेची स्थिती, मालेगावात सभा घेण्याचं कारण, महाविकास आघाडीतील जागावाटपाचा प्रश्न अशा विविध प्रश्नांना आपल्या शैलित रोखठोक उत्तरं दिली. एकेकाळी देशाच्या राजकारणात अग्रेसर असलेल्या महाराष्ट्राची आज पिछेहाट सुरू असून राज्यात अराजकासारखी स्थिती असल्याची चिंता त्यांनी यावेळी व्यक्त केली.

राज्यात अराजकासारखी स्थिती असल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं. महाराष्ट्रात कधी नव्हे इतकं अराजक निर्माण झालं आहे. लाल वादळ मुंबईजवळ थांबलेलं आहे. बिचारे आदिवासी अन्न नाही, पाणी नाही, अशा अवस्थेत निघालेले आहेत. शेतकरी, बेरोजगार युवक रस्त्यावर आहे. शेतकऱ्यांच्या आत्महत्त्या वाढलेल्या आहेत. कायदा-सुव्यवस्थेचा बोजवारा उडालेला आहे. सरकार आहे की नाही ही स्थिती आहे, असं राऊत म्हणाले.

महाराष्ट्राची इतकी वाईट अवस्था कधीच नव्हती!

मंत्रिमंडळाचा विस्तार का रखडला आहे? असा सवाल उपस्थित करत राऊत म्हणाले की, नऊ महिने झाले. सत्तेसाठी तुम्ही सत्तांतर केलं ना. पण लक्ष सुप्रीम कोर्टाकडे लागलं आहे. मंत्रालयात मंत्री जात नाहीत. कारण त्यांना असं वाटतं आहे की मंत्री मंत्रालयात जात नाहीत. कारण त्यांना असं वाटतं आहे की उद्या निकाल येईल आणि आम्हाला घरी जावं लागेल. महाराष्ट्राची इतकी वाईट अवस्था कधीच नव्हती. महाराष्ट्र हे देशाच्या राजकारणात अत्यंत नगण्य ठरलेलं आहे. महाराष्ट्रांचं अस्तित्वच नाही. जो महाराष्ट्र या देशात अग्रेसर होता त्याची आज पिछेहाट सुरू आहे. प्रत्येक बाबतीत महाराष्ट्र मागे पडतो आहे. दुर्दैवानं या राज्यात सत्ता-सरकार आहे की नाही आणि नक्की सरकार कोण चालवतं आहे हे सांगता येत नाही, अशी चिंता राऊत यांनी व्यक्त केली.

महाविकास आघाडीत संपूर्ण समन्वय!

येत्या निवडणुकांच्या जागावाटपाच्या संदर्भात महाविकास आघाडीत संपूर्ण समन्वय आहे आणि चर्चा सुरू आहे. निर्विवादपणे सांगतो की जागा वाटपात कोणताही मतभेद होण्याची शक्यता नाही, असंही संजय राऊत यांनी स्पष्ट केलं.

आधी एकत्र येऊ मग पंतप्रधान ठरवू!

उद्धव ठाकरेंच्या भाषणावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या समर्थानात घोषणा झाली, त्यावरून विचारलेल्या प्रश्नाला राऊत यांनी स्पष्ट शब्दात उत्तर दिलं. शिवसेनाप्रमुखांच्या नावाच्याही घोषणा होतात. महाविकास आघाडी आहे. एकत्र आहोत आम्ही सगळे. शरद पवार यांच्या नावाची घोषणा झाली त्याचं उत्तर उद्धव ठाकरे यांनी त्यावेळी दिलं. आधी एकत्र येऊ मग पंतप्रधान ठरवू. आता काही पंतप्रधानपदाची लढाई नाही, असं त्यांनी स्पष्ट केलं.

…पण गद्दारांना घेणार नाही

शिवसेनेतील अनेक जण शिंदे गटात प्रवेश करत असल्याबद्दल त्यांना प्रश्न विचारण्या आला त्यावेळी एक दिवस शिंदे सोडून सगळे येतील… पण आम्ही त्यांना घेणार नाही. कार्यकर्त्यांचा भ्रमनिरास होतो. तिथे गेलेले कोण आमदार असतील, खासदार असतील पण त्यांना आम्ही घेणार नाही, असं राऊत यांनी स्पष्ट केलं.

मालेगाव सभेचं वैशिष्ट्य…

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी खेडमध्ये अतिविराट अशी सभा घेतली. त्यानंतर पुढल्या सभा या ठरवल्या प्रमाणे होतील. 26 मार्च रोजी उद्धव ठाकरे हे मालेगावमध्ये सभा घेतील. मालेगावातून अद्वैय हिरे यांनी पक्ष प्रवेश केला त्यांची पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी उपनेते पदी निवड केली आहे. त्यांचं काम जोरदार सुरू आहे. त्यांचा पक्ष प्रवेश जरी शिवसेना भवनात झाला असला. तरी हिरे कुटुंबाचा संपूर्ण मालेगाव आणि उत्तर महाराष्ट्रात जोरदार काम आणि वर्चस्व आहे. त्यानिमित्ताने सुद्घा मालेगावच्या सभेला महत्त्व आहे. मालेगावची सभाही उत्तर महाराष्ट्राची सभा म्हणून आम्ही बघतो. त्यानंतर महाविकास आघाडीच्या सभा होतीलच, त्यांच्या तारखा आलेल्या आहेत. पण सोबत शिवसेनेच्या सभाही सुरू राहतील. त्याची सुरुवात खेड पासून झाली. मालेगावच्या सभेकडे देशाचं लक्ष आहे. त्यादृष्टीने आम्ही आज मालेगावला निघाल्याचं सांगितलं.

मालेगाव शिवसेनेचंच राहिल, गद्दारांचं नाही!

हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे हे प्रशांत हिरे यांच्यासाठी मालेगाव येथे आले होते. आता पक्षप्रमुख उद्धव ठाकरे अद्वय हिरे यांच्यासाठी मालेगावात येत आहेत. मालेगावचं वैशिष्ट्य आहे ना, मालेगाव हे शिवसेनेचं आहे, शिवसेनेचंच राहिल. बेईमानांचं, गद्दारांचं नाही, असा सणसणीत टोला त्यांनी मिंधे गटातील आमदारांना लगावला. मालेगावंच्या सभेचं वैशिष्ट्य त्यादिवशी कळेल.

महाराष्ट्रात आणि देशात मुस्लिमांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा!

खेडमध्ये मुस्लीम समाजाने उद्धव ठाकरे यांच्या सभेला जाही पाठिंबा दिला होता, तोच धागा पकडून मालेगावसंदर्भात प्रश्न विचारला असता राऊत म्हणाले की मुस्लिमांनी काय फक्त मोदींनाच किंवा भाजपलाच पाठिंबा द्यावा असं काही आहे का? मुस्लिम समाज देशाचा, महाराष्ट्राचा नागरिक नाही का? महाराष्ट्रात आणि देशात मुस्लिमांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा आहे आणि त्यात काही गैर नाही. निवडणुका आल्यावर या देशात ज्याप्रकारचं वातावरण निर्माण केलं जातं ते रोखण्याचं काम महाराष्ट्रात फक्त शिवसेना करू शकते आणि धार्मिक आणि जातीय सलोखा राखू शकते हा विश्वास असल्यानं मुस्लिम बांधव आमच्यासोबत आहेत, असं संजय राऊत म्हणाले.
महाराष्ट्राची कधी नव्हे इतकी पिछेहाट, राज्यात सरकार आहे का? संजय राऊत यांचा हल्लाबोल

https://www.facebook.com/saamanaonline/videos/6145818805498476/?mibextid=NnVzG8