
हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतिदिनानिमित्त शिवसेनेच्या वतीने मुंबईसह राज्यभरात समाजोपयोगी उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये अनाथ मुलांना खाऊ वाटप, रक्तदान शिबीर, मोफत आरोग्य शिबिरे पार पडणार आहेत.
शिव वाहतूक सेनेच्या वतीने अनाथ मुलांना खाऊ वाटप
शिव वाहतूक सेनेच्या वतीने अनाथाश्रमातील मुलांना खाऊ वाटप करण्यात आले. शिवसेना उपनेते, शिव वाहतूक सेना अध्यक्ष भाऊ कोरगावकर, सरचिटणीस नीलेश भोसले, कार्याध्यक्ष संदीप मोरे यांच्या सूचनेनुसार शिव वाहतूक सेना महाराष्ट्र कोषाध्यक्ष विनायक विश्वनाथ मुरुडकर व सचिव संदेश दीपक शिरसाट यांच्या वतीने मोफत फळ, कपडे, किराणा सामान वाटप करण्यात येणार आहे.
छत्रपती शिवाजी महाराज मैदानात रक्तदान शिबीर
शिवसेना वरळी शाखेच्या वतीने 2012 पासून दर महिन्याच्या 17 तारखेला रक्तदान शिबिराचे आयोजन केले जाते. यंदाचे सलग 155 वे रक्तदान शिबीर सोमवार, 17 नोव्हेंबर रोजी सकाळी 9 ते रात्री 8 या वेळेत छत्रपती शिवाजी महाराज मैदानाजवळील नागरिक संघ हॉल येथे होणार आहे. अरविंद भोसले यांच्या वतीने आणि शिवसेना नेते सुभाष देसाई यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या प्रबोधन गोरेगाव संचलित माँसाहेब सौ. मीनाताई ठाकरे रक्तपेढीच्या सहकार्याने हे शिबीर होणार आहे. या शिबिरात सहभागी होऊन शिवसेनाप्रमुखांना अनोखी आदरांजली अर्पण करावी, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.
संपर्क अरविंद भोसले 9821581860.




















































