
असत्याच्या विरुद्ध सत्याचा बुलंद आवाज आज मुंबईत घुमला. महाराष्ट्रातील मतचोरीच्या विरोधात सर्वपक्षीय नेत्यांच्या नेतृत्वाखाली फॅशन स्ट्रीट ते मुंबई महापालिका मुख्यालय असा विराट मोर्चा निघाला. लाखोंच्या साक्षीने निघालेल्या या सत्याच्या मोर्चाने जणू क्रांतीची ठिणगीच टाकली. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, मनसे अध्यक्ष राज ठाकरे, काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात व डाव्या पक्षांच्या नेत्यांनी मोर्चाला संबोधित करताना निवडणूक आयोगाला थेट आवाज दिला. उपस्थित जनसमुदायाने त्यांना उत्स्फूर्त प्रतिसाद देत ‘मतदार यादी स्वच्छ झालीच पाहिजे’, अशी एकमुखी मागणी केली आणि मतचोरीच्या विरोधात वज्रमूठ आवळली. मतदार याद्या दुरुस्त करा, अन्यथा निवडणुका कशा होतात तेच पाहतो, असा इशाराच या जनशक्तीने दिला. या महामोर्चाने गल्लीपासून दिल्लीपर्यंत हादरे दिले. मतचोरांच्या बुडाला अक्षरशः आग लागली.
महाराष्ट्रातील मतदार याद्यांमध्ये प्रचंड घोळ आहे. सत्तेच्या लालसेपोटी लाखो बोगस मतदार या याद्यांमध्ये घुसवले गेले आहेत. विरोधी पक्षांनी पुराव्यासह ते सिद्ध करूनही निवडणूक आयोगाने काहीच कारवाई केली नाही. त्याविरोधात ही विराट लोकशक्ती आज रस्त्यावर उतरली. रणरणत्या उन्हात दुपारी 2 वाजता महामोर्चाला सुरुवात झाली. फॅशन स्ट्रीटपासून मुंबई महानगरपालिका मुख्यालयापर्यंतचा एक किलोमीटरचा परिसर या मोर्चामुळे भगवामय झाला होता.
विविध राजकीय पक्षांचे झेंडेही रस्त्याच्या दुतर्फा लावण्यात आले होते. मोर्चेकऱयांनीही हाती झेंडे आणि घोषणाफलक घेतले होते. मतदार याद्या स्वच्छ, निर्भेळ, निर्दोष झाल्याच पाहिजेत… मुंबई मराठी माणसाची…नाही कुणाच्या बापाची, गो बॅक भाजपा, भाजपा चले जाव… नही चलेगी नही चलेगी, दादागिरी नही चलेगी… बोगस मतदारांची नावे मतदार यादीतून वगळा, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत व्हीव्हीपॅटचा वापर झालाच पाहिजे… अशा गगनभेदी घोषणा यावेळी आसमंतात घुमल्या.
आदित्य ठाकरे यांचीही उपस्थिती
शिवसेना नेते, युवासेना प्रमुख आमदार आदित्य ठाकरे हे ही या महामोर्चात सहभागी झाले होते. शिवसेना नेते दिवाकर रावते, खासदार अरविंद सावंत, चंद्रकांत खैरे, खासदार अनिल देसाई, विनायक राऊत, आमदार अंबादास दानवे, आमदार सुनील प्रभू, अॅड. अनिल परब, आमदार संजय पोतनीस, उपनेते सचिन अहीर, खासदार संजय दीना पाटील, शिवसेना सचिव, आमदार मिलिंद नार्वेकर, आमदार वरुण सरदेसाई, मनोज जामसुतकर, बाळा नर उपस्थित होते.
मनसे नेते अमित ठाकरे, बाळा नांदगावकर, नितीन सरदेसाई, अविनाश अभ्यंकर, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार, सतेज पाटील, नसीम खान, भाई जगताप, सचिन सावंत, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जयंत पाटील, खासदार सुप्रिया सुळे, प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे, खासदार निलेश लंके, धैर्यशील मोहिते-पाटील, अनिल देशमुख, जितेंद्र आव्हाड, रोहिणी खडसे, राखी जाधव, कम्युनिस्ट पक्षाचे कॉ. प्रकाश रेड्डी, मिलिंद रानडे, अजित नवले, सुभाष लांडे, शेकाप नेते जयंत पाटील उपस्थित होते. शर्मिला ठाकरे यादेखील मोर्चात सहभागी झाल्या होत्या.
राज ठाकरे लोकल ट्रेनने पोहोचले!
राज ठाकरे या मोर्चासाठी लोकलने चर्चगेटपर्यंत पोहोचले. त्यांच्यासह मनसेचे हजारो कार्यकर्तेही लोकलने मोर्चासाठी आले होते. उद्धव ठाकरे, राज ठाकरे, राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे आणि कम्युनिस्ट पक्षाचे नेते, कार्यकर्ते या मोर्चात पायी चालत सहभागी झाले. मुंबई महापालिका मुख्यालयासमोर मोर्चाचे सभेत रुपांतर झाले. तिथे सर्वपक्षीय नेत्यांनी मोर्चेकऱयांना मार्गदर्शन केल्यानंतर मोर्चाची सांगता झाली.































































