शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस या पक्षांची पायरसी करणाऱ्यांनी पुस्तकाच्या पायरसीबाबत बोलू नये; संजय राऊत यांनी खडसावले

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मोदींच्या कार्यकाळात पायरसीचे अनेक प्रकार आहेत. त्यांच्या काळात प्रत्येक गोष्टीची पायरसी होत आहे. राजकीय पक्षांची पायरसी होते, तर एका पुस्तकाची काय बाब आहे? असा सावल करत शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेत, खासदार संजय राऊत यांनी भाजपला चांगलेच फटकारले आहे. माजी लष्करप्रमुख जनरल मनोज नरवणे यांचे पुस्तक प्रकाशित झाले नाही, तरी त्यातील माहिती उघड कशी झाली, याबाबत संजय राऊत यांनी हे वक्तव्य केले.

माजी लष्करप्रमुख जनरल मनोज नरवणे यांचे पुस्तक प्रकाशित झाले नाही, असे सांगण्यात येत आहे. मात्र, मोदींच्या कार्यकाळात पायरसीचे अनेक प्रकार आहेत. त्यांच्या काळात प्रत्येक गोष्टीची पायरसी होत आहे. राजकीय पक्षांची पायरसी होते, तर एका पुस्तकाची काय बाब आहे. उद्धव ठाकरे यांची शिवसेना आणि शरद पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेस या पक्षांची पायरसी कोणी केली? मिंधे आणि अजित पवार यांचे गट ही मोदी आणि शहा यांनी केलेली पायरसीच आहे, त्यामुळे पायरसीवर बोलण्याचा त्यांना अधिकार नाही, त्यांनी त्यावर बोलू नये.

विधानसभा अध्यक्ष आणि विधानपरिषद सभापती यांचे अधिकार निश्चित करण्यासाठी स्थापन केलेल्या समितीचे प्रमुखपद राहुल नार्वेकर यांच्याकडे देण्यात आल्याबाबत संजय राऊत म्हणाले, सत्यानाश, सबका विकास, सबका सत्यानाश, हेच यातून दिसून येत आहे. राहुल नार्वेकरांनी आपल्या अधिकारांचे उल्लंघन करत, सर्व मर्यादा ओलांडत शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या फुटीवर शिक्कामोर्तब केले, पक्षांतरबंदी कायदा पायदळी तुडवला, त्यांच्याकडे या समितीचे अध्यक्षपद देणे म्हणजे डाकू मानसिंगकडे देशाची कायदा सुव्यवस्था देण्यासारखे आहे, असे त्यांनी स्पष्ट केले.

भाषेसाठी नाही लढायचे तर कशासाठी लढायचे. देशाच्या आणि राज्यांच्या निर्मितीत भाषेचे महत्त्वाचे योगदान आहे. देशाची अखंडता कायम ठेवण्यासाठी भाषावार प्रांतरचना करण्यात आली. हिंदी या देशातील प्रमुख भाषा आहे, मात्र, तिचे अतिक्रमण होता कामा नये, प्रत्येक भाषेची संस्कृती आणि तिचे महत्त्व जपणे गरजेचे आहे. त्यामुळे प्रत्येची राज्याची भाषा ही राजभाषा आहे, अशी राष्ट्रीय स्वंयसेवक संघाची भूमिका आहे. त्यामुळे हिंदी सक्तीबाबत राज्याच्या भाषेबाबतच्या भूमिकेला संघाने विरोध करण्याचे कारण नाही, असे मतही संजय राऊत यांनी व्यक्त केले.