पूरग्रस्त शेतकऱ्यांना जाहीर केलेली मदत म्हणजे खोटा नॅरेटिव्ह, राज्य सरकारविरोधात शिवसेनेचे आंदोलन

अतिवृष्टीमुळे शेत आणि घरसंसार उद्ध्वस्त झालेल्या शेतकऱ्याला भरीव मदत देण्यात यावी अशी सातत्याने मागणी होत असतानाही सरकारकडून फसव्या घोषणा आणि आकड्यांचा खेळ सुरू आहे. त्याच्या निषेधार्थ आणि शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी शिवसेनेने (उद्धव बाळासाहेब ठाकरे) आज छत्रपती संभाजीनगर येथील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन केले.

राज्य सरकारने जाहीर केलेल्या ३१,५०० कोटी रुपयांच्या पॅकेजमुळे शेतकऱ्यांमध्ये खोटा नॅरेटिव्ह पसरवण्याचा आरोप करत, पक्षाने शेतकऱ्यांच्या मूळ मागण्या पूर्ण करण्याची मागणी केली आहे. निदर्शनादरम्यान जिल्हाधिकारी यांना एक निवेदन सादर करण्यात आले, ज्यात शेतकऱ्यांना खरा न्याय मिळावा यासाठी तात्काळ कारवाई करण्याची विनंती करण्यात आली आहे.

याप्रसंगी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते अंबादास दानवे आणि चंद्रकांत खैरे यांच्यासह सहसंपर्कप्रमुख विजयराव साळवे, अनिल चोरडिया,जिल्हाप्रमुख राजेंद्र राठोड, महानगरप्रमुख राजू वैद्य, शहरप्रमुख बाळासाहेब थोरात, हरिभाऊ हिवाळे, ज्ञानेश्वर डांगे, तालुकाप्रमुख शंकर ठोंबरे, विष्णू जाधव, महिला आघाडी संपर्क संघटक सुनिता आऊलवार, सहसंपर्क संघटक दुर्गा भाटी, जिल्हा संघटक आशा दातार, महानगर संघटक सुकन्या भोसले व मीना फसाटे उपस्थित होते.