डफावर शाहीराची थाप कडाडली, शिवसेनेचे पुन्हा येईल हो ‘राज’!

मुंबई-महाराष्ट्राच्या भूमीत मऱ्हाट्यांवरच अन्याय, अत्याचार होत असताना हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख सरसेनापती बाळासाहेब ठाकरे यांनी 19 जून 1966 ला शिवसेनेची स्थापना करून मराठीजनांना न्याय मिळवून दिला. मराठय़ांना अंधःकारातून वाट दाखवली. त्यामुळे या ‘मुंबई महाराष्ट्रावर पुन्हा येईल हो शिवसेनेचे ‘राज’, शाहीर भाकीत करतो आज’, असा दुर्दम्य विश्वास व्यक्त करताना डफावर शाहीराची थाप कडाडल्याने शिवसैनिकांमध्ये चैतन्य निर्माण झाले. निमित्त होते षण्मुखानंद सभागृहात आयोजित केलेल्या शिवसेनाप्रमुखांच्या जन्मशताब्दी वर्ष सोहळय़ाच्या शुभारंभाचे.

शाहीर यशवंत जाधव यांनी कार्यक्रमाच्या सुरुवातीलाच प्रबोधनकार, शिवसेनाप्रमुख, शिवसेना आणि मराठी माणसाच्या लढ्याचा गौरवशाली इतिहास सांगणारा पोवाडा सादर केला. ‘ओम नमो श्री जगदंबे’ असा जयजयकार करीत ठाकरे घराण्याने महाराष्ट्रासाठी केलेल्या कार्याचा रतीबच सांगितला. प्रबोधनकार पिता असलेल्या शिवसेनाप्रमुखांचा रमाईच्या पोटी जन्म झाला. वाघरूपी राजाच जन्माला आला. मात्र या काळात मुंबईची परिस्थिती वेगळी होती. बेकारी, लाचारी, वेठबिगारीने मराठी माणूच पिचला होता. सर्व बाजूंनी आगेकूच करणाऱdया मुंबईत परप्रांतीयांनी शिरकाव केल्यामुळे भांडवलदारांनी पाय रोवला. मराठी माणसावर अन्याय होऊ लागला. त्याकाळचे इथले राजकारणी त्यांचे चेले होते. सारेजण स्वतःचेच पोट भरण्यात व्यस्त होते. अशा वेळी मराठी माणसाला वाचवण्याचा विडा सरसेनापती बाळासाहेब ठाकरे यांनी उचलला.