विमानतळाला दिबांचे नाव देण्यासाठी शिवसेनेचा त्याग

नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला लोकनेते दि.बा. पाटील यांचे नाव द्यावे ही शिवसेनेची ठाम भूमिका असून दिबांचे नाव विमानतळाला मिळावे यासाठी शिवसेनेने मोठा त्याग केला आहे, अशी भूमिका शिवसेनेचे उपनेते बबन पाटील यांनी मांडली.

लोकनेते दि. बा. पाटील यांचे नाव विमानतळाला देण्यासाठी सर्वपक्षीय कृती समितीची बैठक झाली. नवी मुंबई विमानतळाला दिबांचे नाव देण्यात येईल, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. हाच धागा पकडून उपनेते बबन पाटील म्हणाले, नवी मुंबई विमानतळाला हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे नाव देण्याचे ठरले होते. परंतु शिवसेना पक्षप्रमुख आणि माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी प्रकल्पग्रस्तांच्या भावना लक्षात घेऊन शिवसेनाप्रमुखांचे नाव मागे घेऊन दिबांचे नाव देण्याचा ठराव मंजूर केला होता. शिवसेनेने मोठा त्याग केल्यानेच दिबांचे नाव विमानतळाला लागण्याचा मार्ग मोकळा झाला, असेही उपनेते बबन पाटील यांनी ठामपणे सांगितले.