
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी इंडिया आघाडीची बैठकीपूर्वी पत्रकार परिषद घेत अनेक मुद्द्यांवर भाष्य केले. देशासमोर टॅरिफ, दहशतवाद, शेतकऱ्यांच्या समस्या, बेरोजगारी, महागाई अशा अनेक समस्या आहेत. मात्र, सध्याचे भाजपचे सरकार देशाचा विचार करण्याऐवजी निवडणुकांमध्ये गुंतले आहेत. कोणता पक्ष फोडायचा, कोणते खासदार, आमदार विकत घ्यायचे, याची खलबते ते करत आहेत. त्यामुळे देशात असलेले सरकार हे भाजपचे सरकार असून देशाचा विचार करणाऱ्या खंबीर आणि मजबूत सरकारची देशाला गरज आहे, असे मत उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केले.
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्ष कार्यालयाला भेट देणार आहे. तसेच आज संध्याकाळी लोकसभेचे विरोधी पक्षेते राहुल गांधी यांनी जेवणाचे निमंत्रण दिले आहे. तिथे जाणार आहे. दिल्लीत आल्यानंतर अनेक पक्षनेत्यांची भेट होत असते. त्यासाठी आपण दिल्लीत आलो आहोत. तसेच इंडिया आघाडीची बैठक होत आहे. लोकसभा निवडणुकीनंतर इंडिया आघाडीची ही पहिलीच बैठक होत आहे. त्याला आपण उपस्थित राहणार आहोत, असेही त्यांनी सांगितले.
याआधी एका व्हिडीओ कॉन्फरन्समध्ये आघाडीतील नेत्यांची चर्चा झाली होती. त्यात संसदेच्या अधिवेशनात कोणते विषय घ्यायचे यावर चर्चा झाली होती. आजच्या बैठकीतही अनेक महत्त्वाच्या विषयांवर चर्चा होणार आहे. उपराष्ट्रपती जगदीप धनकड यांना तडकाफडकी का काढण्यात आले तसेच आता ते कुठे आहेत, हा प्रश्न महत्त्वाचा आहे. त्यामुळे त्यावर चर्चा होणे गरजेचे आहे, असे ते म्हणाले.
बिहार, पश्चिम बंगाल आणि महाराष्ट्रात स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुका होणार आहेत. बिहार निवडणुकीत मतदार याद्यांचा घोळ सुरू आहे. मतदारांना स्वतःची ओळख पटवावी लागत आहे. यावरून देशात अघोषित एनआरसी लागू झाला आहे काय? असा प्रश्न निर्माण होत आहे. या मुद्द्यावरून देशभरात विरोध झाला होता. त्यामुळे अघोषित एनआरसी लागू केला आहे काय, याचे उत्तर निवडणूक आयोगाने द्यावे, असे उद्धव ठाकरे म्हणाले.
स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकांमध्ये ईव्हीएमला आमचा आक्षेप आहे. त्यातच त्यांनी व्हीव्हीपॅट काढून टाकले आहे. म्हणजे निवडणुकीतील पारदर्शकताच यांनी घालवून टाकली आहे. असे करायचे असेल तर निवडणुका कशाला घेत आहेत. आपले मत नेमके कोणाला गेले, हे मतदाराला समजले पाहिजे. मात्र, ईव्हीएममध्ये ही पारदर्शकता नाही. आता व्हीव्हीपॅट काढले तर मत कोणाला जाते, हे मतदाराला समजणारच नाही, असेही ते म्हणाले.
टॅरिफचा प्रश्न खूप महत्त्वाचा आहे. त्याचा फटका देशातील सर्वसमान्य जनतेलाही बसणार आहे. ट्रम्प आपल्या देशाची आणि मोदींची थट्टा करत आहेत, खिल्ली उडवत आहेत. असे असताना त्यांना आपण प्रत्युत्तर देत नाही, त्यांना जाब विचारणे दूरच पण त्यांना उत्तर देणेही शक्य होत नाही, अशा परिस्थितीत देशाचे सरकार कोण चालवतंय कोण, असा प्रश्न निर्माण होत आहे. शिवसेनेच्या वर्धापनदिनी आपण देशाला पंतप्रधान, गृहमंत्री, परराष्ट्रमंत्री यांची गरज आहे, असे विधान केले होते. हे सर्व भाजपचे मंत्री आहे. हे सर्व सरकारचे अपयश आहे. हे सर्व निवडणुकीत गुंतले असल्याने देशाची वाताहत होत आहे. हे सरकार सर्व आघाड्यांवर परराष्ट्र धोरणात सपशेल अपयशी ठरले आहे, असे ते म्हणाले.
भूमिका ठरवायला ठाकरे बंधू समर्थ, तिसऱ्याची गरज नाही; उद्धव ठाकरे स्पष्टच बोलले#uddhavthackeray #shivsenaubt #saamana pic.twitter.com/QHO1m1AFHb
— Saamana Online (@SaamanaOnline) August 7, 2025
पाकिस्तानसारख्या शत्रूशी ते क्रिकेट खेळण्याला परवानगी देण्यात आली आहे. यावरून या सरकारला कोणतीही नितीमत्ता राहिलेली नाही, हे दिसून येते. आपल्याला देशप्रेमाचे धडे देतात आणि हे सर्व जय शहा यांच्यासह सर्वजण स्वतःच्या फायद्यासाठी क्रिकेट सामने खेळवत आहेत. त्यामुळे हे सच्चे देशभक्त नाहीत. पाकिस्तान जोपर्यंत दहशवादी कारवाया थांबवत नाही, तो पर्यंत त्यांच्याशी कोणतेही संबंध ठेऊ नये, याप्रमाणे जे वागत असतील, तेच खरे देशभक्त आहेत. घटनेप्रमाणे लोकशाही वाचवण्यासाठीच्या महत्त्वाचा निकाल तीन वर्षे लागत नाही.आपल्या देशात घटनेचा सन्मान राखला जातोय का, याचीही देशभक्त प्रतीक्षा करत आहेत, याबाबत सर्वोच्च न्यायालयाने योग्य तो निर्णय घ्यावा, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी संसदभवन, नवी दिल्ली येथील शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्ष कार्यालयाला भेट दिली. @ShivSenaUBT_ pic.twitter.com/hfIXmwFelm
— Saamana Online (@SaamanaOnline) August 7, 2025