स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीसाठी शिवसेना सज्ज, कोल्हापुरात शिवसैनिकांचा निर्धार कायम

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे आदेश आणि निर्णयानुसारच शिवसेना जिह्यात आगामी जिल्हा परिषद, नगरपरिषद आणि नगरपालिका निवडणुकींत भगवा फडकविण्यासाठी सज्ज आहे. स्थानिक पातळीवर मित्र पक्षांकडून सकारात्मक प्रतिसाद न मिळाल्यास, मनसेसोबत स्वबळावर लढण्याचा निर्धारही आज शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या पदाधिकाऱयांच्या बैठकीत घेतला.

शिवसेना उपनेते व जिल्हा संपर्कप्रमुख अरुण दुधवडकर यांच्या मार्गदर्शनाखाली शासकीय विश्रामगृहात शनिवारी बैठक झाली.

आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर झालेल्या या बैठकीत जिह्यातील कोल्हापूर लोकसभा आणि हातकणंगले लोकसभा मतदारसंघांतील स्थानिक स्वराज्य संस्थांतील सर्व प्रभागांचा आढावा घेण्यात आला. यावेळी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाकडून इच्छूक उमेदवारांचीही चाचपणी करण्यात आली. उपनेते अरुण दुधवडकर यांनी प्रत्येक पदाधिकाऱयाशी चर्चा करून, त्या-त्या प्रभागातील इतर इच्छुकांचीही माहिती घेतली.

शिवसैनिकांमार्फत घरोघरी जाऊन पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे विचार तसेच शिवसेनेची लोकोपयोगी भूमिका पोहोचविण्याबाबत आवश्यक त्या सूचना पदाधिकाऱयांना दिल्या. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या निर्णयानुसारच लढण्याचा निर्धार करण्यात आला.

यावेळी उपनेते संजय पवार, सहसंपर्कप्रमुख विजय देवणे यांच्यासह सर्व जिल्हाप्रमुख, राज्य संघटक, उपजिल्हाप्रमुख, तालुकाप्रमुख, शहरप्रमुख आदी पदाधिकारी उपस्थित होते.