प्रस्थापितांना धक्के देत शिवसेनेची घोडदौड, 14 नगर पंचायतींवर फडकला भगवा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे समर्थ नेतृत्व आणि शिवसेना नेते, पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांच्या मार्गदर्शनाने राज्यातील नगर पंचायतींच्या निवडणुकांमध्ये शिवसेनेने प्रशंसनीय कामगिरी केली आहे. 14 नगर पंचायतींवर भगवा फडकला आहे. तेथील 284 जागा शिवसेनेच्या ताब्यात आल्या आहेत. पंचायत निवडणुकीतील या कामगिराबद्दल शिवसैनिकांमध्ये आनंद व्यक्त होत आहे. अनेक ठिकाणी विरोधकांना धोबीपछाड देऊन शिवसेनेने पंचायतीवर वर्चस्व मिळवले.

कोकणात रत्नागिरी जिल्ह्यात 2 तर सिंधुदुर्ग जिल्ह्यात 4 नगरपंचायतींच्या निवडणुका झाल्या. रत्नागिरीच्या दापोली नगरपंचायतीमध्ये शिवसेनेने 17 पैकी 6 जागा जिंकल्या तर मंडणगडमध्ये शिवसेना-राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीने 7 जागा जिंकल्या. सिंधुदुर्गातील देवगड-जामसंडे नगर पंचायतीमध्ये शिवसेनेने 8 जागा जिंकून भाजपाला जोरदार धक्का दिला. शिवसेनेच्या मुसंडीमुळे भाजपाच्या नीतेश राणेंच्या हातून देवगड नगरपंचायत निसटली आहे. कुडाळमध्ये शिवसेनेला 17 पैकी 7 जागा मिळाल्या आहेत. तर काँग्रेसकडे 2 जागा असून भाजपला 8 जागांवर यश मिळाले आहे. त्यामुळे त्रिशंकू स्थिती निर्माण झाली आहे.

शहापूर पुन्हा जिंकले; खालापूर, पोलादपुरातही मुसंडी

शिवसेनेने शहापूर नगरपंचायतीवरील आपले वर्चस्व कायम राखले आहे. 17 पैकी 10 जागांवर शिवसेना विजयी झाली. शिवसेनेने केलेल्या धडाकेबाज विकासकार्यांमुळे शहापूरकरांनी पुन्हा एकदा शिवसेनेच्या हाती पंचायतीच्या चाव्या दिल्याची प्रतिक्रिया व्यक्त होत आहे. खालापूर आणि पोलादपुरातही शिवसेनेने सर्वाधिक जागा जिंकल्या. खालापुरात 8 तर पोलादपुरात 10 जागांवर शिवसेना विजयी झाली.

नाशकात निफाड, दिंडोरीत भगव्याचेच सामर्थ्य

नाशिक जिल्ह्यात निफाड आणि दिंडोरी नगरपंचायतींमध्ये शिवसेनेच्या भगव्याने आपले सामर्थ्य दाखवून दिले. निफाडमध्ये शिवसेनेने सर्वाधिक 7 तर दिंडोरीत सर्वाधिक 6 जागा जिंकल्या.

हिंगोलीतील औंढा नागनाथ, नगरच्या सोयगावमध्ये स्पष्ट बहुमत

हिंगोली जिल्ह्यातील औंढा नागनाथ व सेनगाव या दोन्ही नगरपंचायतीच्या एकूण 34 जागांपैकी 14 जागांवर शिवसेनेने विजय मिळवला. औंढा नागनाथ नगरपंचायतमध्ये शिवसेनेने स्पष्ट बहुमत मिळवले. तर सेनगाव नगरपंचायतीत महाविकास आघाडी सत्ता स्थापन करणार हे स्पष्ट झाले आहे. नगरच्या सोयगाव नगरपंचायतीतही 17 पैकी 11 जागा जिंकून शिवसेनेला स्पष्ट बहुमत मिळाले आहे. धाराशीव जिल्हय़ातील लोहारा आणि जालना जिल्हय़ातील मंठा नगरपंचायतीवरही शिवसेनेचा भगवा डौलाने फडकला.

नंदूरबारमध्ये काँग्रेसच्या बालेकिल्ल्यात धडक

नंदूरबारमध्ये शिवसेनेने काँग्रेसच्या बालेकिल्ल्यातच धडक दिली. तेथील धडगाव-वडफळ्या-रोषमाळ नगर पंचायतीच्या 17 पैकी 13 जागांवर शिवसेनेने विजय मिळवला. काँग्रेसला 3 तर भाजपाला फक्त 1 जागा मिळाली. या नगर पंचायतीत शिवसेनेची सत्ता पहिल्यांदाच आली आहे.

साताऱ्यातील कोरेगावात एकहाती सत्ता

साताऱ्यातील कोरेगाव नगरपंचायतीतही शिवसेनेची एकहाती सत्ता आली आहे. शिवसेना 13 जागांवर विजयी झाली.

जळगावातील बोदवड नगरपंचायतही ताब्यात

जळगाव जिह्यातील बोदवड नगरपंचायतीत 17 पैकी 9 जागा शिवसेनेला मिळाल्या. या भागात राष्ट्रवादी काँग्रेसचे वर्चस्व असतानाही शिवसेनेने ही कामगिरी केल्यामुळे शिवसैनिकांमध्ये प्रचंड उत्साह आहे. विशेष म्हणजे शिवसेना आणि दुसऱया क्रमांकावरील राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यापुढे भाजपाचा टिकाव लागला नाही. भाजपाला कशीबशी एक जागा जिंकता आली.

सांगलीच्या खानापुरात शिवसेना-काँग्रेस आघाडीला बहुमत

सांगलीच्या खानापूर नगरपंचायत निवडणुकीत शिवसेना-काँग्रेस आघाडी 9 तर राष्ट्रवादी प्रणित जनता आघाडीने 7 जागा जिंकल्या. त्याचप्रमाणे जनता आघाडीच्या पाठिंब्यावर एक अपक्ष निवडून आला. भाजपाचे पुरते पानिपत झाले. एकूण 17 पैकी एकही जागा भाजपाला जिंकता आली नाही.

यवतमाळातही 25 जागा जिंकल्या

यवतमाळ जिह्यातील सहा नगरपंचायतींमधील एकूण 102 जागांपैकी 25 जागा शिवसेनेने जिंकल्या. बाभूळगावमध्ये सर्वाधिक 6, झरीमध्ये 5, मारेगाव 4, महागाव 5, कळंब 3 आणि राळेगावात 2 जागांवर शिवसेना उमेदवार विजयी झाले.