वरळीत नवरात्रीनिमित्त शिवसेनेचा वैद्यकीय उपक्रम, नऊ आजारांवर मोफत उपचार

शारदीय नवरात्र उत्सवानिमित्त वरळी विधानसभा क्षेत्रात शिवसेना आणि युवासेनेतर्फे वैद्यकीय उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. ‘नवरात्रीचे नऊ रंग 2025’ असा हा उत्सव साजरा केला जात असून नवरात्रीच्या नऊ दिवसांत नऊ आजारांवर मोफत उपचाराची व्यवस्था करण्यात आली आहे.

लायन ताराचंद बापा हॉस्पिटल अ‍ॅण्ड रिसर्च सेंटरच्या सौजन्याने मोफत वैद्यकीय उपचाराचा उपक्रम राबवला जात आहे. केशरी व पिवळे रेशन कार्डधारकांना मोफत उपचारांचा लाभ घेता येणार आहे. नऊ दिवसांत हार्ट बायपास (सीएबीजी)/ हार्ट अँजिओप्लास्टी, लेसर थायरॉईड शस्त्रक्रिया, पाय अँजिओप्लास्टी, ब्रेन स्टेंटिंग, आयव्हीसी फिल्टर (पाय), थ्रोम्बोलिसिस (पाय), व्हॅरिकोज व्हेन्स, पर्मपॅथ आणि एव्ही फिस्टुला, डायलिसिस या आजारांशी संबंधित मोफत उपचार करण्यात येणार आहेत. या मोफत उपचारांचा लाभ गरजूंनी घ्यावा, असे आवाहन वरळी विधानसभा मतदारसंघाचे युवा विभाग अधिकारी संकेत सावंत यांनी केले आहे.