
विद्यार्थ्यांच्या आंदोलनानंतर अखेर शिवाजी विद्यापीठाकडून परीक्षा वस्तुनिष्ठ पद्धतीने (एमसीक्यू) घेण्याचा निर्णय मान्य करण्यात आला. या मागणीसाठी विद्यार्थ्यांकडून काल ठिय्या आंदोलन करण्यात आले होते. तर, विद्यार्थ्यांनी आज लाक्षणिक उपोषण केले.
दरम्यान, कुलगुरू डी. टी. शिर्के यांच्या अध्यक्षतेखाली आज विद्यापीठ अधिकार मंडळाच्या बैठकीत चर्चा करून विद्यापीठाच्या परीक्षा ऑफलाइन एमसीक्यू पद्धतीने घेण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती विद्यापीठ प्रशासनाने दिली.
शिवाजी विद्यापीठात बहुतांश अभ्यासक्रम ऑनलाइन पद्धतीने शिकवला जात असताना परीक्षा पद्धत बदलामुळे विद्यार्थी संभ्रमावस्थेत आहेत. एकीकडे काही विद्यापीठांत एमसीक्यू परीक्षा पद्धतीचा अवलंब करण्यात येत असताना शिवाजी विद्यापीठाने दीर्घोत्तरी पद्धतीने परीक्षा घेण्याचा निर्णय घेतला होता. याच्या विरोधात विद्यार्थी संघटनांकडून काल बुधवारी मोर्चा काढून ठिय्या आंदोलन करण्यात आले. याबाबत कुलगुरू डी. टी. शिर्के यांना मागण्यांचे निवेदनही देण्यात आले. आज पुन्हा परीक्षा झाल्यानंतर विद्यार्थ्यांनी लाक्षणिक उपोषण केले. यावेळी ऑल इंडिया युथ फेडरेशनसह विविध विद्यार्थी संघटना तसेच विद्यार्थी सहभागी झाले होते.
दुपारपर्यंत निर्णय न झाल्यास कुलगुरूंच्या दालनात बेमुदत उपोषण करण्याचा इशाराही देण्यात आला होता. शिवाय या मागण्यांबाबत कार्यवाही न झाल्यास जनहित याचिका दाखल करून विद्यार्थ्यांच्या वतीने न्यायालयात ठाम भूमिका मांडण्याचा निर्णय जनसंघर्ष सेनेच्या वतीने घेण्यात आला होता. शिवाय याप्रकरणी न्यायालयाचा आदेश स्वीकारण्यासह हिंसक आंदोलने करून भविष्य धोक्यात आणू नका, असे आवाहनही जनसंघर्ष सेनेच्या वतीने करण्यात आले होते. यावेळी गिरीश फोंडे, शुभम शेळके, आकाश केंगार, अभिजित खोत, अजय गावडे, राजवर्धन पाटील उपस्थित होते.



























































