समितीसमोर आम्ही भूमिका मांडली, जोपर्यंत निर्णय होत नाही तोपर्यंत नाराजी कायम – शिवाजीराव कर्डिले

1421

आमचा पराभव झाल्यानंतर वस्तुस्थिती विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्याकडे मांडली. त्यावर आम्ही ठाम आहोत. पराभवबद्दल पुरावे द्या आणि उदाहरण द्या, असे विखे-पाटील यांनी सांगितले होते. आम्ही त्याच वेळेला अनेक उदाहरणे दिली आहेत. पराभवाच्या प्रकरणाची चौकशी सुरू झाली असून आजी-माजी तिन्ही आमदारांची चौकशी झाल्याची माहिती माजी मंत्री शिवाजीराव कर्डिले यांनी दिली. मात्र, चौकशी पूर्ण होऊन निर्णय होत नाही, तोपर्यंत आमची नाराजी कायमच राहील, असेही त्यांनी स्पष्ट केले. नगरमध्ये एका कार्यक्रमासाठी आलेल्या कर्डिले यांनी पत्रकारांना ही माहिती दिली.

कार्डिले म्हणाले की, आमचा पराभव झाल्यानंतर आम्ही मुंबईमध्ये लेखी पत्र दिले आहे. त्यावर सर्व आजी माजी आमदारांच्या सह्या आहेत. त्यामध्ये बबनराव पाचपुते, बाळासाहेब मुरकुटे यांच्यासह मोनिका राजळे, राम शिंदे, स्नेहलता कोल्हे व माझीही सही आहे. त्यामुळे आमचे म्हणणे आम्ही लेखी स्वरूपात दिले आहे. कोणीही भूमिकेत बदल केलेला नाही, अशी त्यांनी स्पष्ट केले. आमची भूमिका आम्ही पक्षाकडे मांडली आहे. त्या भूमिकेवर आजही आम्ही ठाम आहोत. त्या वेळी झालेल्या चर्चेमध्ये पराभवाची चौकशी केली जाईल, असे सांगण्यात आले. त्यानुसार विजय पुराणिक तसेच भाजपाचे निरीक्षक काळकर यांची चौकशीसाठी नियुक्ती झाली असून चार दिवसांपूर्वी माझ्या घरी राम शिंदे ,मोनिका राजळे व माझी चौकशी करण्यात आली आहे. आम्ही सर्व पुरावे तसेच आमच्या म्हणणे आम्ही त्या समितीसमोर सादर केले आहेत .लवकरात लवकर समिती या प्रकरणाची चौकशी करेल, असे आम्हाला आशा आहे. मात्र, चौकशी पूर्ण होऊन, निर्णय होत नाही, तोपर्यंत आमची नाराजीही कायमच आहे, असे त्यांनी स्पष्ट केले. चौकशी समिती पारदर्शीपणे चौकशी करेल असे ते म्हणाले.

मुंबईत झालेल्या बैठकीत राधाकृष्ण विखे-पाटीलही उपस्थित होते. त्यांच्यासमोरच आम्ही आमची नाराजी व्यक्त केली आहे. खासदार सुजय विखे यांनी जे वक्तव्य केले, त्यावर विचारले असता ते म्हणाले आम्ही एकच काय अनेक उदाहरणे दिली आहेत, असेही ते म्हणाले. या संदर्भातील नाराजी कायम असल्याचे त्यांनी सांगितले. जी चौकशी समिती नेमली आहे, ती आपली चौकशी पारदर्शकपणे करेल, याबद्दल शंका नाही. काँग्रेस आणि भाजपा यांच्यामध्ये निश्चित फरक आहे. भाजपमध्ये काँग्रेससारखे प्रकार चालत नाही, असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले. नगर जिल्ह्याचा पालकमंत्री हा नगर जिल्ह्यातील असला पाहिजे. कारण त्याला या जिल्ह्यातील प्रश्न माहीत असतात. ते कसे सोडवायचे हे पण माहीत असते. बाहेरचा पालकमंत्री दिल्यामुळे अनेक विषय प्रलंबित राहतात, हे उदाहरण आहे. वास्तविक पाहता मंत्री बाळासाहेब थोरात यांच्यासारखा ज्येष्ठ मंत्री जिल्ह्यात असताना त्यांच्याकडे पालकमंत्रीपद द्यायला पाहिजे होते. मात्र ते दिले गेले नाही. दोन्ही पक्षांचा एकमेकांवर विश्वास नसल्यामुळे बाहेरचा पालकमंत्री देण्याची वेळ आली असल्याचा आरोपही त्यांनी केला. थोरात यांना पालकमंत्री केले असते, तर निश्चितपणे जिल्ह्यात विकासाला संधी मिळाली असती, असेही त्यांनी सांगितले.

राज्यामध्ये महाविकास आघाडीचे सरकार स्थापन झाले आहे. वास्तविक पाहता सध्याची वक्तवे बघता त्यांच्यामध्ये तालमेळ दिसून येत नाही. मात्र, नव्याने सरकार स्थापन झाल्यामुळे त्यांना सहा महिन्याचा अवधी दिला पाहिजे, असेही ते म्हणाले. सहा महिन्यानंतर सरकार योग्य पद्धतीने चालले नाही, तर आम्हाला आमची भूमिका निश्चितपणे माडांवी लागेल, असे त्यांनी सांगितले. हे सरकार जनतेच्या समस्यांकडे दुर्लक्ष करत आहे. एकीकडे मुंबई नाईट लाईफ सुरू केली असून शेतकऱ्यांचे प्रश्न अद्यापही दुर्लक्षित आहे. सरकार फक्त मुंबईपुरतेच मर्यादित आहे का, असा सवालही त्यांनी उपस्थित केला. शिवसेना ही मुंबई महानगरपालिकेमध्ये सत्ता यावी, यासाठी सर्व कामाला लागले आहे, तरी त्यांनी स्पष्ट केले. जिल्हा सहकारी बँकेची निवडणूक होत आहे. या निवडणुकीमध्ये जो कुणी आमच्यासोबत येईल, त्याला आम्ही बरोबर घेऊन पुढे जाणार असल्याचेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले. जिल्ह्याचे माजी पालकमंत्री प्राध्यापक राम शिंदे यांनी विखे पिता-पुत्र सोबत कोणताही समेट झाला नाही, अशी भूमिका मांडली होती. यावर माजी आमदार शिवाजी कर्डिले यांना विचारले असता ते म्हणाले, ‘राम शिंदे यांची भूमिका योग्यच आहे,’ दरम्यान यावरून अद्यापी भाजपमध्ये सर्वकाही आलबेल नसल्याचे स्पष्ट होत आहे.

आपली प्रतिक्रिया द्या