
हॉरर मेकअप म्हटलं की, आपल्या डोळ्यांसमोर वेगवेगळे भयानक चेहरे उभे राहतात. आपण हॉरर चित्रपट पाहतो आणि अनेक दिवस हे चेहरे आपल्या डोळ्यांसमोरून हटतच नाहीत. मात्र हे चेहरे तयार करण्याची मेहनतही तेवढीच असते. त्यासाठी मेकअप आर्टिस्टला तासन्तास उभं राहून काम करावं लागतं. कलाकारांना देखील तेवढीच मनाची तयारी करावी लागते.
अनेकांना असं वाटत असतं की, हे हॉरर मेकअप म्हणजे कॅमेऱ्याची, व्हिज्युअल इफेक्टची, व्हिडीओ एडिटिंगची कमाल आहे, पण त्यात मेकअप आर्टिस्टचाही तेवढाच मोठा सहभाग असतो. कारण त्याच्याशिवाय या अशा प्रकारच्या प्रतिमा तयार होणे अशक्यच! नॉर्मल चित्रपटातील मेकअप किंवा हॉरर चित्रपटातील मेकअप यांच्यात जमीन अस्मानाचा फरक असतो.
हॉरर मेकअपला लागणारी उपकरणं व साहित्य वेगळी असतात. हॉरर मेकअपमध्ये मुखवटे असतात. हे मुखवटे कागदाचे, लाकडाचे, कापडाचे किंवा कापड आणि कागद यांच्या लगद्यापासून बनवले जातात. यामध्ये रबर
(Latex)हा एक महत्त्वाचा भाग असतो. एकासारखा दुसरा चेहरा करण्यासाठी किंवा त्वरित बदल दाखविण्यासाठी या रबरी मुखवटय़ांचा उपयोग करतात. यामध्ये खोटं रक्त, वेगवेगळ्या प्रकारचे दात, डोळ्यांचे वेगवेगळे आकार, वेगवेगळ्या लेन्सेस, लाइनिंग कलर, प्लॅस्टर ऑफ पॅरिस, डिंक किंवा गम, तार यांचा वापर करतात.
थिएटरसाठी जेव्हा हॉरर मेकअप केला जातो तेव्हा कापडी किंवा कागदी मुखवटा चेहऱ्यावर अधांतरी बसवला जातो. संपूर्ण चेहरा काळ्या कापडाने झाकला जातो. यामध्ये डोळे आणि नाक या ठिकाणी काही छिद्रं असतात. त्यातून श्वास घेण्यासाठी मोकळीक मिळते. मात्र या मुखवटय़ांमध्ये ओठांची हालचाल होत नसते. तसेच अनेक वेळा तोंडातून आलेले शब्द बाहेर पडण्यासही अडथळा येतो.
प्लॅस्टर ऑफ पॅरिसचा मास्क तयार करताना, ज्या आर्टिस्टच्या चेहऱ्यावर हा मुखवटा बसवायचा असतो, त्याच्या चेहऱ्याला व्हॅसलिन अथवा पोमेड नीट चोळून लावावे लागते. त्यानंतर त्यावर येणारे प्लॅस्टर ऑफ पॅरिसचे बँडेज चिकटून बसणार नाही व काढताना ते सहज निघेल तऱहेने लावावे लागते. व्हॅसलिन लावून झाल्यावर नाकपुडय़ांमध्ये कापसाचे बोळे हलकेच सरकवावे लागतात, जेणेकरून श्वसनाचा त्रास होणार नाही. प्लॅस्टर ऑफ पॅरिसचे बँडेज घेऊन ते वेगवेगळ्या मापाचे, रुंदीचे कापावे लागतात. हे कोरडे कापलेले तुकडे एक-एक करून पाण्यात बुडवून लगेच चेहऱ्यावर लावावे लागतात. जेवढय़ा भागाचा मुखवटा तयार करायचा असेल, त्या भागावर हे तुकडे एकावर दुसरा तुकडा ठेवून तो थर जाड करत जावा लागतो. तीन ते चार थर पुरेसे होतात. त्यानंतर प्लॅस्टर थोडय़ाच वेळात घट्ट होऊ लागते. एकदा का प्लॅस्टर घट्ट झाले की, चेहऱ्यावरचा तो भाग खाली काढून घ्यावा लागतो. हा प्लॅस्टर ऑफ पॅरिसचा मुखवटा आर्टिस्टच्या चेहऱ्याचा साचा म्हणजेच मोल्ड असतो. हा साचा पूर्ण वाळल्यावर त्यात संघजिऱ्याची पावडर मारून ओल्या शाडूने या साच्यातून प्रतिमा काढावी लागते.
मास्क तयार झाल्यानंतर शूटिंगच्या वेळेस जेव्हा तो वापरला जातो, तेव्हा एक मास्क एका वेळेसच वापरला जातो. त्यानंतर पुन्हा मास्क तयार करावा लागतो. फक्त आधीची जी प्रक्रिया असते मोल्डिंगपासूनची, त्यातून पुन्हा जावं लागत नाही, तर फक्त मास्क तयार करण्यासाठीच पुन्हा वेळ लागतो.
प्रोस्थेटिक मेकअप अगदी खराखुरा वाटतो आणि चित्रपटात तर तो जास्तच खरा वाटतो. कारण त्याला इतर तंत्रज्ञानाची जोड मिळते. आपल्याला तो चित्रपट पडद्यावर किंवा स्टेजवर पाहताना इतका खरा वाटतो की, काही क्षण घाबरून आपणही आपले डोळे मिटून घेतो किंवा अनेक वेळा तर स्वप्नांमध्ये किंवा एखाद्या अंधाऱ्या ठिकाणी आपल्याला तो चेहरा दिसू लागतो. एवढी ताकद त्या मेकअपमुळे निर्माण झालेली असते. यातच हॉरर चित्रपटातील त्या भूमिकेचं मोठं यश असतं. अनेक चित्रपटांतून हॉरर मेकअपची कमाल आपण अनुभवली असेलच.
कॅरेक्टरचा अभ्यास महत्त्वाचा
हॉररपटाचा मेकअप हा स्पेशल इफेक्ट आणि प्रोस्थेटिक मेकअप अशा स्वरूपाचा असतो. प्रोस्थेटिक करण्यासाठी एक वेगळी नजर, अनुभव, क्रिएटिव्हिटी मेकअप आर्टिस्टकडे असावी लागते. हॉरर मेकअप करताना कोणत्या प्रकारचं कॅरेक्टर करायचं आहे, हे मेकअप आर्टिस्टला प्रथम पहावं लागतं. त्यानंतर त्याचं एक डिझाइन तयार केलं जातं. मग त्यावर चित्रपटातील दिग्दर्शक व इतर टीम एकत्र बसून विचारविनिमय करतात. या सगळ्यांच्या विचारविनिमयानंतर जे कॅरेक्टर हवं आहे, त्याचा अंदाज घेतला जातो. ज्या चेहऱ्यावर हे कॅरेक्टर तयार करायचं आहे, त्याचं एक स्केच घेऊन त्यानुसार एक मोल्डिंग तयार केलं जातं. त्या मोल्डिंगवर प्रोस्थेटिक किंवा स्पेशल इफेक्ट केला जातो. यासाठी रबराचा वापर केला जातो. तसेच थिएटरमध्ये अनेक वेळा लाइनिंग कलरचा वापर करून वेगवेगळ्या प्रकारचे चेहऱ्यावर स्ट्रोक्स देऊन किंवा चेहऱ्यावर वेगवेगळे हॉरर वाटतील असे व्रण तयार करूनही मेकअप केला जातो.
हॉरर मेकअप हा पटकन होणारा मेकअप नसतो. यासाठी अनेक तास लागतात. त्यामध्ये काही वेळा एक आठवडा, पंधरा ते वीस दिवस किंवा काही महिनेही लागू शकतात. तसेच ही संपूर्ण प्रक्रिया लॅबमध्ये तयार होत असते. त्यामुळे मेकअप आर्टिस्टला अनेक तास यासाठी मेहनत घ्यावी लागते.
>> शिवानी गोंडाळ (मेकअप आर्टिस्ट)
























































