
मुंबई पोर्ट ट्रस्टच्या (बीपीटी) जागेत असलेल्या शिवडी बीडीडी चाळींच्या पुनर्विकासाला शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या प्रयत्नामुळे चालना मिळणार आहे. या पुनर्विकासासाठी केंद्र सरकारची परवानगी मिळवण्यासाठी पाठपुरावा करण्याचे आश्वासन राज्य शासनाने आज विधानसभेत दिले. तोपर्यंत या चाळींच्या दुरुस्तीसाठी म्हाडाकडून निधी उपलब्ध करून दिला जाईल, असेही शासनाकडून सांगण्यात आले.
शिवसेना गटनेते अजय चौधरी यांनी यासंदर्भात लक्षवेधी सूचना मांडली होती. शिवडी बीडीडी येथे 12 इमारती आहेत. 1921 मध्ये बांधलेल्या त्या चाळी आता धोकादायक स्थितीत आल्या आहेत. 960 कुटुंबे तिथे राहतात. या इमारतींच्या पुनर्विकासासाठी आपण गेली सात वर्षे प्रयत्न करतोय. त्यासाठी शिवसेना नेते, खासदार यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळ घेऊन केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि सोनोवाल यांची भेट घेतली; परंतु अद्याप निर्णय झालेला नसल्याचे चौधरी म्हणाले.
केंद्र सरकारने या चाळींची जमीन राज्याला दिली तर त्याचे पैसे द्यायलाही राज्य सरकार तयार आहे, असा प्रस्ताव तत्कालीन गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी ठेवला होता. गृहनिर्माण राज्यमंत्री असताना रवींद्र वायकर यांच्या आदेशाने म्हाडाने वास्तुशास्त्रज्ञ मे.जी. डी. सांभारे ऍण्ड कंपनी यांची नियुक्ती करून शिवडी येथील पुनर्विकास प्रकल्पाचा सुसाध्यता अहवाल तयार केला आणि तो बीपीटीला पाठवला आहे. राज्य शासनाने हा अहवाल केंद्र शासनास पाठविला आहे. इतक्या प्रयत्नांनंतरही अद्याप शिवडी बीडीडी चाळींच्या पुनर्विकासाला चालना मिळालेली नाही असे सांगतानाच, आमदार चौधरी यांनी पुनर्विकासाबाबत सरकारची भूमिका काय, पाठपुराव्यासाठी विशेष अधिकारी नेमणार का, केंद्रीय मंत्र्यांबरोबर संयुक्त बैठक घेणार का, त्याच जागेवर रहिवाशांचे पुनर्वसन करणार का, तोपर्यंत दुरुस्तीसाठी निधी देणार का असे सवाल उपस्थित केले.
गृहनिर्माण मंत्री अतुल सावे यांनी यावर उत्तर देताना सांगितले की, मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्या नेतृत्वाखाली केंद्रीय मंत्र्यांची भेट घेऊन याबाबत तातडीने कार्यवाही होण्याबाबत पाठपुरावा करण्यात येईल. तत्पूर्वी स्थानिक लोकप्रतिनिधींबरोबर मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत बैठक घेण्यात येईल. पुनर्विकासासाठी जागा राज्याच्या ताब्यात येणे आणि त्याला केंद्राची परवानगी मिळणे आवश्यक आहे. जमीन हस्तांतरित करण्याची विनंती केंद्राला करण्यात आली असल्याचेही त्यांनी सांगितले.



























































