शिवडी-न्हावा शेवा ट्रान्सहार्बर लिंक प्रकल्प सप्टेंबर 2023 पर्यंत पूर्ण; मुख्यमंत्र्यांनी घेतला आढावा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मुंबई ट्रान्स हार्बर लिंक प्रकल्पाचे सुमारे 35 ते 40 टक्के काम पूर्ण झाले असून सप्टेंबर 2023 पर्यंत हा प्रकल्प पूर्ण करण्यात येणार असल्याची माहिती मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत आज आयोजित केलेल्या बैठकीत देण्यात आली.

मुंबई शहरासह महानगर परिसराच्या दळणवळणासाठी महत्त्वपूर्ण असलेल्या पायाभूत सुविधांच्या विकास प्रकल्पांचा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज ‘वर्षा’ निवासस्थानी आयोजित बैठकीत आढावा घेतला. हे प्रकल्प कालमर्यादेत पूर्ण करून नागरिकांना सुलभ आणि गतिमान परिवहन सेवा उपलब्ध करून द्यावी, असे निर्देश मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिले.

यावेळी ‘एमएमआर रिजनल प्लान’ या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले. बैठकीत मुंबई ट्रान्स हार्बर लिंक (एमटीएचएल), मुंबई, पुणे, नागपूर आणि नाशिक मेट्रो प्रकल्पांच्या कामांची सद्यस्थिती, भविष्यातील नियोजन, निधीची उपलब्धता या सर्व बाबींचा सविस्तर आढावा घेण्यात आला. यावेळी महामेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक ब्रिजेश दीक्षित यांनी पुणे, नागपूर आणि नाशिक मेट्रोबाबत सादरीकरण केले.

या  बैठकीला नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे, मुंबई उपनगरचे पालकमंत्री व पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे, मुख्यमंत्र्यांचे अपर मुख्य सचिव आशिषकुमार सिंह, प्रधान सचिव विकास खारगे, नगरविकास विभागाचे प्रधान सचिव भूषण गगराणी, एमएमआरडीए आयुक्त श्रीनिवासन, मुख्यमंत्र्यांचे सचिव आबासाहेब जऱहाड व अन्य उपस्थित होते.

मुंबईत 14 मेट्रो लाईन्स

मुंबईतील सुमारे 14 मेट्रो लाईन्स प्रकल्पाद्वारे 337 कि.मी. मेट्रोचे जाळे निर्माण होणार आहे. मुंबईत मेट्रोची कामे अनेक ठिकाणी सुरू असून कामाच्या ठिकाणी पावसाचे पाणी साचणार नाही याची दक्षता घेण्याच्या सूचना मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिल्या.