वाढीव बिल देणार्‍या ‘अदानी’ला शिवसेनेचा दणका

कोरोनाचा प्रभाव आणि लॉकडाऊनमुळे नोकरी, व्यवसाय डबघाईला आले असताना अदानी इलेक्ट्रिसीटीकडून ग्राहकांना हजारो रुपयांची वाढीव बिले पाठवण्यात आली आहेत. याची गंभीर दखल घेत शिवसेनेने दिंडोशी विभागाच्या अधिकार्‍यांना निवेदन देत तातडीने वाढीव बिल मागे घ्या, अन्यथा जोरदार आंदोलन करू असा इशारा दिला.

तीन महिन्यांपासून सुरू असलेल्या लॉकडाऊनमुळे अनेकजण बेरोजगार झाले आहेत. अनेकांना स्थलांतरित व्हावे लागले असून उपासमारीची वेळ आली आहे. असे असताना अदानी इलेक्ट्रिसिटीकडून वीज ग्राहकांना तीन ते चार महिन्यांची बिले दंड आकारून आणि वाढीव पाठवण्यात आली आहेत. यामध्ये पाचशे ते आठशे रुपये येणारे बिल तीन हजार, बारा हजार, सतरा हजार रुपयांचे पाठवण्यात आले आहे. त्यामुळे आर्थिक स्थिती डबघाईला आली असताना ही बिले कशी भरणार असा प्रश्न निर्माण झाला आहे. या पार्श्वभूमीवर शिवसेना विभाग क्रमांक 2 च्या वतीने विभागप्रमुख सुधाकर सुर्वे यांच्या नेतृत्वाखाली अदानी इलेक्ट्रिसिटी महाव्यवस्थापकांना निवेदन देण्यात आले. संदीप नाराळे, सुधाकर विदे दिंडोशी विभाग अधिकारी यांनी हे निवेदन स्विकारले. यावेळी विधानसभा संघटक संतोष धनावडे, उपविभागप्रमुख प्रदीप ठाकूर, शाखाप्रमुख सुभाष धानुका, सचिन देसाई, उत्तर भारतीय संपर्क प्रमुख अ‍ॅड. कमलेश यादव आदी उपस्थित होते. शिवसेनेने अदानी इलेक्ट्रिसिटी कार्यालयावर धडक दिल्यानंतर प्रशासनाने वाढीव बिले तातडीने कमी करू असे आश्वासन दिले.

आपली प्रतिक्रिया द्या