रस्त्याच्या कामात दिरंगाई; शिवसेनेचे ठिय्या आंदोलन

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

यावली सालसे राज्य महामार्ग क्रमांक 202 ची दुरुस्ती अतिशय संथगतीने होत आहे. रस्त्याच्या दुरुस्तीच्या कामात दिरंगाई होत असल्याने त्याविरोधात माढा शहर शिवसेनेने छत्रपती शिवाजी महाराज चौकात सोमवारी सकाळी11 वाजल्यापासून ठिय्या आंदोलन सुरु केले आहे. यावेळी शिवसेना शहर प्रमुख शंभू साठे ,मुन्ना साठे, युवासेना प्रमुख भैय्या खरात, दत्तात्रय चवरे दत्ता साठे, तुकाराम माढेकर, राजू गोटे ,संतोष जगदाळे यांनी ठिय्या आंदोलन सुरू केले आहे.

यावली सालसे राज्य मार्ग क्रमांक 202 रस्ता दुरुस्तीचे छत्रपती शिवाजी चौकातील पुलावरील काम गेल्या काही महिन्यांपासून सुरू आहे. या पुलाच्या निकृष्ठ दर्जाबाबत शिवसेनेने आवाज उठवल्यानंतर जुना पूल पाडून नवीन बांधकाम सुरू आहे. मात्र, गेले दोन महिने कामात फारशी प्रगती झाली नसल्याने नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे.

रस्त्याचे काम पूर्ण होत नसल्याने त्याचा फटका सर्वसामान्य वाहतूकदारांना बसत आहे. हा रहदारीचा मुख्य रस्ता आहे. यावरून सोलापूर कुर्डुवाडी वैरागकडे वाहतूक होत असते. त्यातच आता साखर कारखाने सुरू असल्याने ऊस वाहतूक करणारे ट्रॅक्टर या रस्त्यावरून वाहतूक करतात. रस्त्याच्या दुरुस्तीमुळे जड वाहनांच्या रांगा लागत असल्याने वाहतूक कोंडी नेहमीचीच झाली आहे. दुचाकीस्वारांना कसरत करत यातून मार्ग काढावा लागत आहे.

या वाहतूक कोंडीमुळे अपघात होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. जड वाहनांची वाहतूकी साठी पर्यायी व्यवस्था उपलब्ध नाही. त्यामुळे सार्वजनिक बांधकाम विभागाने या पुलावरील काम प्राधान्याने पूर्ण करण्यासाठी योग्य ती पावले उचलण्याची मागणी जोर धरत आहे. या समस्येची दखल घेत शिवसेनेने कामाच्या दिरंगाईविरोधात सोमवारी ठिय्या आंदोलन केले आहे.