अवैध कोचिंग क्लासेस वर शिवसेना करणार हल्लाबोल

26
shivsena-logo-new


सामना प्रतिनिधी, चंद्रपूर

राज्यात वर्ष 2017 पासून इंटिग्रेटेड कोचिंग क्लासेस बंद करण्याचे आदेश असताना सुद्धा चंद्रपूर जिल्ह्यात हे कोचिंग क्लासेस सर्रासपणे सुरू आहेत. यावर जिल्हा प्रशासनाचे जाणीवपूर्वक दुर्लक्ष असून यावर कारवाई न केल्यास शिवसेनेतर्फे हल्लाबोल आंदोलनाचा इशारा जिल्हाप्रमुख संदीप गिर्हे यांनी दिला आहे.

जिल्ह्यात अशा शेकडो अवैध खाजगी शिकवण्या सुरू आहे. यामध्ये शिक्षण घेणारे विद्यार्थी नावापुरते महाविद्यालयात प्रवेश घेऊन पूर्ण वेळ कोचिंग क्लासेस मध्ये असतात. या शिकवणी वर्गामध्ये 10वी, 11वी व 12वी च्या विद्यार्थ्यांकडून लाखो रुपये घेत असतात, नियमांची पायमल्ली करून हे कोचिंग क्लासेस अवैधरित्या सुरू आहेत. या सर्व बाबी लक्षात घेता शिवसेनेचे जिल्हाप्रमुख संदीप गिर्हे यांनी जिल्हाधिकारी यांना कारवाई करण्यासंबंधी निवेदन दिले. प्रशासनाकडून 4 दिवसाच्या आत कारवाई न झाल्यास अवैधपणे सुरू असलेल्या कोचिंग क्लासेसवर शिवसेनेतर्फे हल्लाबोल आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे. या वेळी शिवसेनेच्या कुसुम उदार, भारती दुदानी, बंडू हजारे, प्रमोद पाटील व अनेक शिवसैनिकांची उपस्थिती होती.

आपली प्रतिक्रिया द्या