
शिवसेनेमध्ये इतर पक्षातून येणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. सोलापूरचे माजी आमदार दिलीप माने यांनी बुधवारी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला. यावेळी पत्रकारांशी बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले की ज्यांची ज्यांची प्रामाणिकपणे काम करण्याची इच्छा आहे त्या सगळ्यांसाठी शिवसेनेचे दरवाजे खुले आहेत.
माने यांच्या पक्षप्रवेशानंतर पत्रकारांनी उद्धव ठाकरे यांना युतीसंदर्भातील प्रश्न विचारले. या प्रश्नांना उत्तर देताना उद्धव ठाकरे म्हणाले की “युतीच्या मनोमिलनावर प्रश्नचिन्ह निर्माण करण्याचे कारण नाही. लोकसभा निवडणुकीच्या आधी मी, मुख्यमंत्री आणि अमितभाई यांची चर्चा झाली होती. त्यानंतर जी वरळीतील ब्ल्यू सी हॉटेलमध्ये पत्रकार परिषद झाली त्यामुळे पुढची युती कशी असेल हे मुख्यमंत्र्यांनी सांगितले होते. युतीचा फॉर्म्युला हा तेव्हा ठरलेला आहे. शिवसेनेचा अध्यक्ष म्हणून मी आणि भाजपचे अध्यक्ष म्हणून अमित शहा तिथे असताना राज्याच्या मुख्यमंत्र्यांनीच हे जाहीर केलेले आहे. जबाबदार व्यक्तीने ही गोष्ट जाहीर केल्यानंतर बाकीच्या चर्चेला काहीही अर्थ नाहीये”
परिस्थिती चांगली असून शिवसेना आणि भाजपमध्ये नेते येत आहेत असं सांगतानाच उद्धव ठाकरे म्हणाले की दिलीप माने यांचे पुनर्वसन कसं करायचं हे ठरल्याशिवाय त्यांना घेतलेलं नाही. कोणालाही अंधारात ठेवून पक्षात घेतलेलं नाही असंही उद्धव ठाकरे. सगळे जण पदाचे किंवा सत्तेचे हपापलेले आहेत, आणि तेच आमच्याकडे येत आहेत अशातला भाग नसून प्रामाणिकपणे काम करण्याची ज्यांची इच्छा आहे त्या सगळ्यांसाठी शिवसेनेचे दार खुले आहे असे उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट शब्दात सांगितले.


























































