
सामना ऑनलाईन, ठाणे
अवघ्या महाराष्ट्राचे लक्ष लागून राहिलेल्या कर्जत नगरपालिकेवर भगवा फडकला असून तब्बल 25 वर्षांनंतर राष्ट्रवादीची सत्ता उलथवली आहे. या निवडणुकीत महायुतीने 18 पैकी 10 जागा जिंकून घवघवीत यश मिळवले असून नगराध्यक्षपदी शिवसेनेच्या सुवर्णा जोशी याही दणदणीत मतांनी निवडून आल्या आहेत. भगवा फडकल्यानंतर हजारो शिवसैनिकांनी ढोल-ताशांच्या गजरात जल्लोष केला. गेली अनेक वर्षे कर्जत नगरपालिकेत ‘हम करेसो कायदा’ करणाऱया राष्ट्रवादीचे आता खऱ्या अर्थाने ‘उत्तरायण’ सुरू झाले आहे. 18 जागांसाठी 45 उमेदवारांचे भवितव्य रविवारी मशीन बंद झाले होते. आज सकाळी दहापासून अभिनव प्रशालेत मतमोजणीला प्रारंभ झाला.
राष्ट्रवादीच्या आमदाराला दे धक्का
आमदार सुरेश लाड यांची मुलगी व विद्यमान नगराध्यक्षा प्रतीक्षा लाड या पुन्हा नगराध्यक्षपदाची निवडणूक लढवत होत्या. मात्र शिवसेनेच्या सुवर्णा जोशी यांनी 2 हजार 694 मतांनी त्यांचा दणदणीत पराभव केला. जोशी यांना 9 हजार 976 तर लाड यांना 7 हजार 282 एवढी मते मिळाली. त्याशिवाय सुरेश लाड राहत असलेल्या दहिवली प्रभाग क्रमांक तीनमध्ये महायुतीला दोन जागा मिळाल्याने राष्ट्रवादीच्या आमदाराला जोरदार धक्का बसल्याचे दिसून आले. खासदार श्रीरंग बारणे, रायगड संपर्कप्रमुख दत्ता दळवी तसेच उपजिल्हाप्रमुख महेंद्र थोरवे यांच्यासह स्थानिक पदाधिकाऱयांनी जबदरस्त व्यूहरचना करून राष्ट्रवादीचे मनसुबे उधळून लावले.
विकासावर लक्ष केंद्रित करणार
कर्जतच्या मतदारांनी शिवसेनेवर दाखवलेला विश्वास आपण सार्थ करून दाखवणार असून आता केवळ विकासावरच लक्ष केंद्रित करणार असल्याचे नवनिर्वाचित नगराध्यक्षा सुवर्णा जोशी यांनी सांगितले. भुयारी गटार योजना, भाजी मंडई, नाटय़संकुल, क्रीडांगण आदी विविध कामे करायची असून विकासनाम्याची पूर्तता करण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
कर्जत नगरपालिकेच्या निवडणुकीत तीन वेळा निवडून येऊन शिवसेनेचे उमेदवार नितीन सावंत यांनी हॅटट्रिक केली आहे. 2009 पासून ते नगरसेवक असून यावेळी राष्ट्रवादीचा बालेकिल्ला असलेल्या प्रभाग क्रमांक 4 मधून त्यांनी निवडणूक लढवली. सावंत यांनी राष्ट्रवादीचे मल्हारी माने यांचा 327 मतांनी पराभव केला.
एकजुटीचा विजय
या निवडणुकीत शिवसेना, भाजप व आरपीआय यांची महायुती होती. यावेळी कोणत्याही परिस्थितीत नगरपालिकेतून राष्ट्रवादीला हद्दपार करायचेच, असा निर्धार करण्यात आला होता. राष्ट्रवादीच्या एकाधिकारशाहीविरोधात एकजुटीचा झालेला हा विजय असल्याची प्रतिक्रिया शिवसेनेचे खासदार श्रीरंग बारणे, आमदार व जिल्हाप्रमुख मनोहर भोईर, उपजिल्हाप्रमुख महेंद्र थोरवे, भाजपचे आमदार प्रशांत ठाकूर व आरपीआयचे जिल्हाध्यक्ष जगदीश गायकवाड यांनी व्यक्त केली आहे.
विजयी शिलेदार
सुवर्णा जोशी / नगराध्यक्ष, विवेक दांडेकर, प्राची डेरवणकर, नितीन सावंत, संचिता पाटील (शिवसेना ), विशाखा जिनगरे, बळवंत घुमरे, स्वामिनी मांजरे, अशोक ओसवाल (भाजप), राहुल डाळिंबकर, वैशाली मोरे (आरपीआय).

































































