
सामना ऑनलाईन । मुंबई
मुंबईत लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराच्या अंतिम टप्प्यात चौकसभा, रोड शो, प्रचारयात्रांच्या माध्यमातून वातावरण ढवळून निघाले आहे. मुंबईतल्या सहा लोकसभा मतदारसंघांत महायुतीच्या उमेदवारांचाच बोलबाला आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रचारसभांना मोठा प्रतिसाद मिळत असून सर्वत्र शिवसेना-भाजपचा झंझावात दिसत आहे.
दक्षिण मुंबईत महायुतीचे उमेदवार अरविंद सावंत यांनी अतिशय झंझावाती प्रचार सुरू केला असून जनतेचा त्यांना चांगला पाठिंबा मिळताना दिसत आहे. दक्षिण-मध्य मुंबईत राहुल शेवाळे यांनी पदयात्रा, रथयात्रांमुळे मतदारसंघ ढवळून काढत प्रचारात आघाडी घेतली आहे. उत्तर-पश्चिम मुंबई मतदारसंघाचे उमेदवार शिवसेना नेते गजानन कीर्तिकर यांचा प्रचार जोरात सुरू असून मतदारसंघात सर्वत्र महायुतीला अनुकूल वातावरण निर्माण झाले आहे. उत्तर-मध्य मुंबईत महायुतीच्या पूनम महाजन यांचा जोरात प्रचार सुरू असून प्रतिस्पर्धी काँग्रेस उमेदवार प्रिया दत्त यांच्यावर प्रचारात आघाडी घेतली आहे. उत्तर-पूर्व मुंबईत मनोज कोटक यांनी प्रचारात आघाडी घेतली असून शिवसेना-भाजप कार्यकर्त्यांनी घरोघरी जाऊन प्रचार करण्यावर भर दिला आहे. उत्तर मुंबईत गोपाळ शेट्टी यांची लढत काँगेस उमेदवार अभिनेत्री उर्मिला मातोंडकर यांच्याशी होत असल्याने प्रचारात चांगलीच रंगत आली आहे.
यांच्यात होणार प्रमुख लढत
उत्तर मुंबई
- भाजप – गोपाळ शेट्टी
- काँग्रेस – उर्मिला मातोंडकर
उत्तर-पश्चिम मुंबई
- शिवसेना – गजानन कीर्तिकर
- काँग्रेस – संजय निरुपम
उत्तर-पूर्व मुंबई
- भाजप – मनोज कोटक
- राष्ट्रवादी – संजय पाटील
उत्तर-मध्य मुंबई
- भाजप – पूनम महाजन
- काँग्रेस – प्रिया दत्त
दक्षिण-मध्य मुंबई
- शिवसेना – राहुल शेवाळे
- काँग्रेस – एकनाथ गायकवाड
दक्षिण मुंबई
- शिवसेना – अरविंद सावंत
- काँग्रेस -मिलिंद देवरा
























































