
सामना प्रतिनिधी, नाशिक/संभाजीनगर
शिवसेना-भाजप युतीच्या उत्तर महाराष्ट्र आणि मराठवाडय़ातील पदाधिकाऱ्यांचा मेळावा उद्या रविवार, 17 मार्च रोजी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत होत आहे. संभाजीनगरातील मेळावा सूतगिरणी रोड, डी मार्टजवळील श्री हरी पॅव्हेलियनमध्ये सकाळी 10.30 वाजता तर नाशिकचा मेळावा चोपडा बँक्वेट हॉल येथे दुपारी 2 वाजता होईल.
या मेळाव्याला शिवसेना नेते-खासदार संजय राऊत, विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे, शिवसेना नेते-खासदार चंद्रकांत खैरे, भाजप प्रदेश अध्यक्ष खासदार रावसाहेब दानवे, पालकमंत्री एकनाथ शिंदे, समन्वय समितीचे प्रमुख राज्यमंत्री अर्जुन खोतकर, ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे, जलसंपदामंत्री, उत्तर महाराष्ट्र समन्वयक, पालकमंत्री गिरीश महाजन, संरक्षण राज्यमंत्री सुभाष भामरे, पर्यटनमंत्री जयकुमार रावल, ग्रामविकास राज्यमंत्री, समन्वयक दादा भुसे, सहकार राज्यमंत्री गुलाबराव पाटील हे उपस्थित राहणार आहेत.
मेळाव्यानंतर संभाजीनगर लोकसभा मतदारसंघाचे शिवसेना-भाजप युतीच्या समर्थनगर येथील मध्यवर्ती प्रचार कार्यालयाचेही उद्घाटन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार आहे.

























































