राहुल गांधींना कोलू फिरवायला सांगा मग सावरकर कळतील, उद्धव ठाकरेंकडून समाचार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । नांदेड/हिंगोली

स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल अपशब्द बोलणारे काँग्रेस अध्यक्ष राहूल गांधी यांची शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांनी जबरदस्त सालटी काढली. सावरकर  अंदमानच्या ज्या कोठडीत होते तेथे २४ तास राहूल गांधी ठेवा, कोलू फिरवायला लावा, चाबकाचे फटके द्या, मग त्याला सावरकर कळतील. चला मुरारी हिरो बनणे, इटली नाही हिंदुस्थान आहे लक्षात ठेव, असा भीमटोला शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांनी लगावला. सत्तेत असलो तरी शेतकर्‍यांच्या बाजूने राहील, सत्तेसाठी लाचार होणार नाही हा महाराष्ट्राला शब्द देतो, असे वचनही उध्दव ठाकरे यांनी हदगाव येथे आयोजित सभेत बोलताना दिले.

यावेळी शिवेसना उपनेते, विश्वनाथ नेरुरकर, शिवेसना सचिव मिलिंद नार्वेकर, राज्यमंत्री अर्जुन खोतकर, महसुल राज्यमंत्री संजय राठोड, उमेदवार हेमंत पाटील, आमदार सुभाष साबणे, आमदार नागेश पाटील आष्टीकर यांची उपस्थिती होती.

हिंगोली लोकसभा मतदारसंघाचे शिवसेना-भाजपा महायुतीचे उमेदवार तथा आमदार हेमंत पाटील यांच्या प्रचारासाठी शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांची हदगाव येथील उमरखेड कॉर्नरवर शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे नगरीमध्ये अतिविराट सभा झाली.

उद्धव ठाकरे म्हणाले की, “आजच्या सभेचा मुहूर्त चांगला आहे, आज रामनवमी आहे, तर उद्या भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती आहे. या दोन्ही दिवसाचा मुहूर्त साधून येथे आलो आहे, तुमचे आजचे हे विराट रुप म्हणजे भगवे तुफान आले आहे.” आमच्या सभेला माणसं भाड्याने आणावे लागत नाहीत, तर भगव्या विचारावर प्रेम करणारा जनसागर येथे आला आहे असे उद्धव ठाकरे म्हणाले.

तसेच “मराठवाडा किंबहुना महाराष्ट्र दुष्काळाने होरपळतोय. पाणीटंचाई असताना तुम्ही तुमचे दुःख बाजूला ठेवून येथे आलात, मी तुम्हाला, महाराष्ट्राला शब्द देतो, छत्रपती शिवप्रभूंच्या, आई तुळजाभवानीच्या, बाळासाहेबांच्या आणि तमाम जनता जनार्दनाच्या आशिर्वादाने  मी कायम शेतकर्‍यांसोबत राहील.” सत्तेत असलो तरीही शेतकर्‍यांची साथ कधी सोडणार नाही, सत्तेसाठी कधी लाचार होणार नाही, असे वचन उध्दव ठाकरे यांनी देताच उध्दव ठाकरे तुम आगे बढोच्या घोषणा सभास्थळी देण्यात आल्या.