
शिवसेनेला कुणीही संपवू शकत नाही. शिवसेनेला छप्पन्न वर्षे झाली. या छप्पन्न वर्षांत असे छप्पन पाहिले, त्यांना गाडून शिवसेना पुढे गेलीय. शिवसेनेवर आघात करण्याचा ज्या-ज्या वेळी प्रयत्न झाला तेव्हा शिवसेना आघात करणाऱयाला गाडून शिवसेना चौपटीने वाढली, अशा शब्दांत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी गद्दार मिंधे गटाला फटकारले. ‘मातोश्री’ निवासस्थानी उरण येथील शिवसैनिकांनी आज उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. त्यांच्याशी संवाद साधताना उद्धव ठाकरे यांनी राज्यात पुन्हा आपलीच लाट येणार आणि पुन्हा शिवसैनिक मुख्यमंत्री होणार असा ठाम विश्वास व्यक्त केला.
रायगड जिह्यातील उरण येथील शेकडो शिवसैनिकांनी आज मातोश्री निवासस्थानी जाऊन उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. यावेळी त्यांनी मशालीही आणल्या होत्या. त्याचप्रमाणे अनेक शिवसैनिकांनी आपल्या छातीवर मशाल हे नवे चिन्ह तसेच शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे हे नवे नाव गोंदले होते. शिवसैनिकांनी आणलेल्या मशालींकडे पाहून उद्धव ठाकरे म्हणाले की, त्यांनी आपले चिन्ह गोठवले, नाव गोठवले पण रक्त पेटवले आहे आणि हे सळसळते रक्त त्यांना राजकारणातून गाडल्याशिवाय राहणार नाही असा मला विश्वास आहे.उद्धव ठाकरे यांनी यावेळी शिवसैनिकांना जास्तीत जास्त सदस्य नोंदणी करा, कागदाच्या लढाईत आपण हरता कामा नये, असे आवाहनही केले.
उद्धव ठाकरे यांनी यावेळी दसरा मेळाव्याच्या यशाबद्दल शिवसैनिकांना धन्यवाद दिले. शिवसेनेच्या दसरा मेळाव्याकडे जगाचे लक्ष होते असे ते म्हणाले. पॅनडा, ब्रिटनमधील मराठी माणसांनीही तिथे बसून दसरा मेळावा पाहिला. इतकेच नव्हे तर तेथील स्थानिक लोकांना आपल्या भाषणाचा अनुवाद करूनही ते सांगत होते आणि ही माहिती त्यांनी स्वतःच फोन करून शिवसैनिकांना दिली असे उद्धव ठाकरे म्हणाले.



























































